Thursday, January 29, 2026

दादा माणूस!

दादा माणूस!

'ते' अजातशत्रू अजिबात नव्हते. तसं होण्यासाठी त्यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत. कोणीही त्यांचा कधी द्वेष केला नाही. प्रत्येकाच्या मनात ते 'दादा'च होते. ते ना 'साहेब' झाले, ना कुणाचे 'सर'. कुटुंबातल्या कर्त्या मुलासारखं महाराष्ट्राचं 'कर्ते'पण त्यांनी स्वतःच आपल्याकडे घेतलं होतं.

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच काळाने महाराष्ट्रावर घाला घातला. संपूर्ण महाराष्ट्राने ज्यांना 'दादा' म्हणून स्वीकारलं होतं, त्यांचा एका विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी काल सकाळी वाऱ्यासारखी पसरली आणि काही काळ कुणालाच काही सुचेनासं झालं. अजितदादा गोड, मधाळ बोलण्यासाठी प्रसिद्ध नव्हते. त्यांनी आलेल्या प्रत्येक माणसाच्या 'हो'ला 'हो' केलं नाही. घरातल्यांपासून ते प्रशासनातील उच्च पदस्थांपर्यंत 'सांभाळून घेण्या'साठी त्यांनी कुणाच्या चुका दृष्टीआड केल्या नाहीत. त्यांचं कुणावरही प्रेम ऊतू गेल्याचं कधी उघड दिसलं नाही. त्यांच्या संपर्कात आलेला कोणीही, कधीही त्यांच्या जिभेच्या फटकाऱ्यापासून वाचला नाही. ते अजातशत्रू अजिबात नव्हते. तसं होण्यासाठी त्यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत. त्यांच्या नावात 'अजित' असलं, तरी त्यांना घरातल्या घरातच अनेक पराभव पचवावे लागले. काही उघड, काही मनातल्या मनात. अनेकदा त्यांचा स्वतःशीच संघर्ष चालत असे. तेही तो मनमोकळेपणाने बोलून दाखवत असत. गैरवाजवी काम घेऊन आलेल्यावर ते डाफरले नाहीत, असं कधी झालं नाही आणि त्यांना आवर्जून भेटायला गेलेल्याचंही त्यांनी मोठ्या प्रेमभराने स्वागत केलं, असंही झालं नाही. त्यांच्या राजकारणाबद्दल, शरद पवार यांचे पुतणे असल्याबद्दल, त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल, नंतर वयोवृद्ध काकांचं बोट सोडल्याबद्दल घराघरांत त्यांच्यावर त्या त्या वेळी टीका झाली. पण, कोणीही त्यांचा कधी द्वेष केला नाही. प्रत्येकाच्या मनात ते 'दादा'च होते. ते ना 'साहेब' झाले, ना कुणाचे 'सर'. कुटुंबातल्या कर्त्या मुलासारखं महाराष्ट्राचं 'कर्ते'पण त्यांनी स्वतःच आपल्याकडे घेतलं होतं. त्यामुळे, राज्यातल्या कुठल्याही सभेत कोणीही फाटका तरुण त्यांच्या भाषणात मधेच बोलून अडथळा आणू शकायचा आणि दादाही समयसूचकतेने त्याला प्रतिसाद देऊन आपलं भाषण पुढे नेत असत. हा मनमोकळा आपलेपणा त्यांनी स्वतः कमावला होता. त्यांच्या दुर्दैवी अपघाताने त्यामुळेच महाराष्ट्राचा घात झाल्याची भावना पसरली. त्यांच्या मृत्यूची वार्ता अधिकृतरीत्या आल्यानंतर ज्यांच्या हृदयात कालवाकालव झाली नाही, आपल्या आयुष्यात काही अशुभ घडलं आहे असं ज्यांना वाटलं नाही, अशी माणसं या राज्यातच काय; देशात विरळा असतील. महाराष्ट्राबाहेर संपूर्ण देशातलं राजकीय वर्तुळ, त्या वर्तुळाशी संबंधित प्रत्येक जण हळहळला तो त्यामुळेच. तीस वर्षांपेक्षा अधिक काळ आमदार-मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या दादांची ख्याती प्रशासन कुशल, महाराष्ट्राची सखोल जाण असलेला, प्रसिद्धीच्या कोणत्याही मोहिमा न राबवता त्यासाठी कोणतीही क्लृप्ती न योजता घराघरांत पोहोचलेला 'दादा' अशी होती. वर्तमानकाळात असे व्यक्तिमत्त्व आणि अशी लोकप्रियता निश्चितच दुर्मीळ आहे.

शरद पवार यांचे पुतणे, त्यांचा राजकीय वारस, त्यांनी स्वतःच्या तालमीत तयार केलेला 'घरातला माणूस' म्हणून अजितदादांना खूप फायदा झाला, अनेक संधी त्यांच्या पायाशी चालून आल्या यात शंकाच नाही. त्या अर्थाने त्यांचा राजकीय प्रवास तुलनेने सुखद, विना अडथळा झाला. पण, शरद पवार यांच्यासारख्या प्रभावशाली नेत्याच्या सावलीत वाढूनही त्यांनी त्यांची छाप स्वतःवर पडू दिली नाही. ते आपल्या काकांचे त्या अर्थाने अनुयायी नव्हते. त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाला स्वतंत्रपणे फुलू दिलं. आपल्या स्वभावाला मुरड घालण्याच्या भानगडीतही ते पडले नाहीत. 'मी जसा आहे, तसा स्वीकारा', असं अव्यक्त आवाहन त्यांनी महाराष्ट्राला केलं आणि ते स्वीकारलंही. महाराष्ट्राचा कानाकोपरा त्यांनी माहीत करून घेतला होता. त्यामुळे, कुठल्याही गावातील मागणी असो, की रेंगाळलेले प्रकल्प असो; त्यातील कृष्णधवल-सारे रंग त्यांना माहीत असत. दीर्घकाळ अर्थमंत्रीपदी राहण्याचा मोह मुख्यतः याच कारणांसाठी त्यांना पडत असावा. शासनकर्ता म्हणून आपल्यावर असलेल्या जबाबदारीची पुरेपूर जाणीव त्यांना असे. अर्थमंत्री पदाच्या माध्यमातून काय रोखायचं आणि कशाला गती द्यायची, यातला समतोल ते नेमका राखत असत. त्यात राजकारण होत नसेल, असं नाही. राजकारण राजकारण्याने नाही करायचं, तर कोणी करायचं? पण, आपल्याकडे जी सत्ता आहे, त्याची मर्यादा कुठपर्यंत आहे, याचीही त्यांना सजग जाणीव असे. ही जाणीव त्यांना कधीही सोडून गेली नाही. त्यामुळे, अनेक मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करूनही कोणाही मुख्यमंत्र्यांची त्यांच्याबद्दल कधी तक्रार ऐकू आली नाही. मुख्यमंत्री अन्य पक्षाचा असो, आपल्या काकांचा विरोधक असो, की आपली संधी काढून ज्याला दिली गेली असा असो, मुख्यमंत्र्यांचा मान त्यांनी कधीही खाली पडू दिला नाही. जाहीर तर नाहीच, पण आपल्या विभागाच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अगदी छोट्याशा बैठकीतही नाही. आपल्या विरोधकांबाबतही त्यांनी कधी अपशब्द वापरले नाहीत. ही राजकीय संस्कृती, वैधानिक पदांबाबतचा आदर आणि राजस संयम हाच महाराष्ट्राच्या 'यशवंत परंपरे'चा वारसा आहे. या वारशाचे आपण वारसदार आहोत याची जाणीव आणि अभिमान त्यांना होता. तोंडातून अपशब्द निघून गेला म्हणून ते आत्मक्लेशासाठी कराडच्या प्रीतिसंगमावर जाऊन बसले, ते जबाबदारीच्या त्याच ओझ्याने. राजकारणात तडजोडी कराव्या लागतात. विरोधकांशीच हातमिळवणी करावी लागते. आपल्या प्रकृतीचा विचार करून, जनमानसाचा कौल बाजूला सारून राजकीय निर्णय घ्यावे लागतात. हे सगळं दादांनी केलं. पण, त्याच्या मर्यादाही कसोशीने पाळल्या. त्यामुळे, 'आजकाल सगळेच करतात. कोण करत नाही?' असं त्यांनी कुठे त्याचं जाहीर समर्थन केलं नाही. महायुती सरकारमध्ये सामील असूनही त्यांचं वैशिष्ट्य त्यामुळेच ते अबाधित राखू शकले.

दादांच्या अशा अवचित जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर खोल परिणाम अपेक्षितच आहे. गेली अनेक दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी असलेल्या 'पवार फॅक्टर'चे ते आताचे चलनात असलेले प्रतिनिधी होते. येत्या जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची सरमिसळ अपरिहार्य होती. राज्यात काँग्रेस विकलांग अवस्थेत असताना, भाजपची घोडदौड जोरदार सुरू असताना, हा मधला 'पवार फॅक्टर' राज्यात काम करत होता. आता तो पूर्ण निष्प्रभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, महाराष्ट्राच्या राजकारणाचा रथ काही काळ असंतुलित होईल. पुन्हा नवं ध्रुवीकरण होईल, नवी समीकरणं जुळतील, राजकारणाचा प्रवाह अखंड प्रवाही राहील. पण, त्या प्रवाहाचं 'अजित दादा' नांवाचं वळण मात्र इतिहासात दीर्घकाळ 'जिवंत' राहील!

Comments
Add Comment