दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळत आहे. भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माने फलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान अधिक मजबूत केले असून, कर्णधार सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा दिमाखात 'टॉप १०' मध्ये पुनरागमन केले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत बॅटने आग ओकणाऱ्या अभिषेक शर्माने रेटिंगमध्ये झेप घेतली आहे. अभिषेकचे रेटिंग ९०३ वरून आता ९२९ वर पोहोचले आहे. तो त्याच्या २०२५ मधील ९३१ रेटिंग गुणांच्या ऐतिहासिक विक्रमापासून अवघ्या २ गुण दूर आहे. आगामी सामन्यांमध्ये त्याने ही लय कायम राखल्यास तो टी-२० क्रिकेटमध्ये रेटिंगचा नवा 'हिमालय' सर करेल. भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन नाबाद अर्धशतके झळकावल्याचा मोठा फायदा त्याला मिळाला आहे. सूर्याने क्रमवारीत थेट पाच स्थानांची प्रगती केली आहे. तो आता ७१७ रेटिंग गुणांसह सातव्या क्रमांकावर विराजमान झाला असून, जगातील पहिल्या १० फलंदाजांमध्ये त्याचा पुन्हा एकदा समावेश झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाने आधीच ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या विजयाचा फायदा भारतीय खेळाडूंना वैयक्तिक क्रमवारीतही मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसत आहे. चाहत्यांचे लक्ष आता अभिषेक शर्माच्या आगामी विक्रमी कामगिरीकडे लागले आहे. क्रमवारीवर नजर टाकल्यास, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजांमधील अंतर आता लक्षणीयरीत्या वाढले आहे. इंग्लंडचा फिल सॉल्ट ८४९ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अभिषेक आणि सॉल्ट यांच्यातील ही मोठी तफावत पाहता, आगामी टी-२० विश्वचषकात अभिषेक शर्मा 'नंबर वन' फलंदाज म्हणूनच मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.
तिलक वर्मा 'टॉप ३' मध्ये कायम
भारतीय संघाचा युवा फलंदाज तिलक वर्मा सध्या खेळत नसला, तरी तो ७८१ रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर स्थिर आहे. अन्य फलंदाजांमध्ये इंग्लंडचा जोस बटलर (७७० रेटिंग) चौथ्या, पाकिस्तानचा साहिबजादा फरहान (७६३ रेटिंग) पाचव्या आणि श्रीलंकेचा पथुम निसांका (७५८ रेटिंग) सहाव्या स्थानावर कायम आहे.
सूर्याच्या पुनरागमनाचा इतरांना फटका
सूर्यकुमार यादवने टॉप १० मध्ये पुनरागमन केल्यामुळे ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श आणि टिम सायफर्ट यांना प्रत्येकी एक स्थान खाली घसरावे लागले आहे. मात्र, तरीही हे खेळाडू टॉप १० मध्ये टिकून आहेत. सध्या आयसीसी टी-२० क्रमवारीत भारताचे तीन फलंदाज टॉप १० मध्ये आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांनंतर या क्रमवारीत पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे.






