अलिबाग : राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील १३ जानेवारी २०२६ च्या आदेशान्वये रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-२०२६ जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत नियमांचे पालन काटेकोरपणे करणे अनिवार्य असल्याचे नमुद करुन, काय करावे व काय करु नये याबाबतची मार्गदर्शक सुचना जिल्हाधिकारी तथा. जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी जारी केल्या आहेत. चालू असलेले कार्यक्रम, योजना पुढे सुरु ठेवता येतील. ज्याविषयी शंका निर्माण होईल अशा बार्बीच्या संबंधात, राज्य निवडणूक आयोग, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण, मान्यता प्राप्त करण्यात यावी. पूर, अवर्षण, साथीचे रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी साह्यकारी व पुनर्वसनाच्या उपाययोजना चालू करता येतील व या संदर्भात चालू असलेल्या योजना पुढे सुरु ठेवता येतील.
मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रक्कम किंवा वैद्यकीय सवलती देण्याचे समुचित मान्यतेने पुढे चालू ठेवता येईल. मैदानासारख्या सार्वजनिक जागा सर्व पक्षांना, निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांना निवडणूक सभा घेण्यासाठी निःपक्षपातीपणे उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व पक्षांना, निवडणुकीस उभे असलेल्या उमेदवारांना हेलिपॅडच्या वापर निःपक्षपातीपणे उपलब्ध करुन दिला पाहिजे. विश्रामगृहे,डाकबंगले व इतर शासकीय निवासस्थाने वगैरेबाबतीत निवडणूक आयोगाने व त्या अनुषंगाने शासनाने काढलेल्या आदेशास संपूर्णतः अधीन राहून सर्व राजकीय पक्षांना व निवडणुकीस उभे असलेल्या सर्व उमेदवारांना समानतेच्या तत्वावर उपलब्ध करुन देता येणे अनुज्ञेय असल्यास त्याप्रमाणे देण्यात यावेत. इतर राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्यावर करण्यात येणारी टीका ही त्यांची धोरणे, कार्यक्रम, पूर्वीची कामगिरी, पार पडलेली कामे, केवळ या बाबींशी संबंधित असावी. शांततामय व उपद्रवरहित गृहस्थ जीवन जगण्याच्या प्रत्त्येक व्यक्तीच्या अधिकाराचे पूर्णपणे जतन करण्यात यावे. प्रस्तावित सभेची जागा व वेळ याविषयी स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना पूर्ण माहिती देण्यात यावी आणि त्यांसाठी आवश्यकत्या सर्व परवानग्या मिळविण्यात याव्यात. प्रस्तावित सभेच्या जागी निबंधात्मक व प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्यांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. आवश्यक असल्यास त्याबाबत सवलत मिळण्याविषयी सवलत मिळविली पाहिजे. वैमनस्य वाढवणारी कृती करु नये : परस्परातील वैमनस्य वाढेल किंवा त्यांच्यात तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये. खाजगी जीवनातील कोणत्याही पैलूवर टीका करण्यात येऊ नये.






