Tuesday, January 27, 2026

Bengaluru Crashes Car : क्रिकेटमधील पराभवाचा राग जीवावर बेतला! मद्यधुंद मित्राने कार झाडावर आदळली अन् लटकलेल्या तरुणाचा... थरार डॅशकॅममध्ये कैद

Bengaluru Crashes Car : क्रिकेटमधील पराभवाचा राग जीवावर बेतला! मद्यधुंद मित्राने कार झाडावर आदळली अन् लटकलेल्या तरुणाचा... थरार डॅशकॅममध्ये कैद

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका क्रिकेट सामन्यानंतर झालेल्या वादाचे पर्यावसान भीषण हत्याकांडात झाले आहे. किरकोळ वादातून एका २७ वर्षीय तरुणाने आपल्या मित्राच्या चालत्या कारला लटकून थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र मित्राने क्रूरतेचा कळस गाठत कार थेट झाडावर आदळली. या भीषण अपघातात कारला लटकलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, हा सर्व अंगावर शहारे आणणारा प्रकार कारच्या डॅशकॅममध्ये कैद झाला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रशांत (वय २८, रा. हेब्बागोडी) आणि त्याचा मित्र रोशन हेगडे (वय २७) हे एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत त्यांच्या संघाचा पराभव झाला, ज्यावरून मैदानावरच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. संध्याकाळी दोघांनी एकत्र मद्यपान केले, मात्र क्रिकेटमधील पराभवाचा राग शांत झाला नव्हता. मद्याच्या नशेत हा वाद पुन्हा उफाळून आला.

डॅशकॅममधील तो भयानक थरार

वाद वाढल्यानंतर रोशन आपल्या कारमध्ये बसून निघून जाऊ लागला. त्याला थांबवण्यासाठी प्रशांतने धावत्या कारच्या डाव्या बाजूच्या खिडकीचा दरवाजा घट्ट पकडला. प्रशांत कारला लटकलेला असतानाही रोशनने गाडीचा वेग कमी केला नाही. संतापलेल्या रोशनने जाणूनबुजून कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर नेऊन आदळली. या धडकेत गाडीचा दरवाजा आणि झाड यामध्ये प्रशांत चिरडला गेल्याने तो गंभीर जखमी झाला.

पोलिस कारवाई आणि गुन्ह्याची नोंद

अपघातानंतर प्रशांतला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. कार चालक रोशन हेगडे हा देखील या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी कारमधील डॅशकॅम फुटेज जप्त केले असून, त्या आधारे रोशनविरुद्ध खुनाचा (Murder) गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा