धाराशिव : प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर थोड्याच वेळात ५५ वर्षीय मोहन भीमा जाधव या पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तलमोड येथे घडली.
मोहन जाधव हे तलमोड येथील चेक पोस्टवर एक्साईज इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी चेक पोस्टवर ध्वजवंदन केले. तिरंग्याला सलामी दिल्यानंतर ते उपस्थितांसोबत फोटो काढत होते. फोटो काढणे सुरू असतानाच मोहन जाधव यांना अस्वस्थ वाटू लागले. काही लक्षात येण्याआधीच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते सर्वांसमोर जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले.
मोहन जाधव हे मूळचे सोलापूर येथील रहिवासी होते. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची विभागात ओळख होती. त्यांना नुकतेच प्रमोशन मिळालं होतं, त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण होते. मात्र, पदोन्नतीचा आणि राष्ट्रीय उत्सवाचा हा आनंद नियतीने हिरावून नेला. सोमवार २६ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी राष्ट्रध्वजाला दिलेली सलामी ही त्यांची अखेरची सलामी ठरली.






