Sunday, January 25, 2026

मुंबईच्या महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

मुंबईच्या महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

चर्चेतील कुठला नगरसेवक ठरणार सरस?

मुंबई : मुंबईचा महापौर हा महायुतीचा होणार हे आता स्पष्ट झाल्याने मोठा पक्ष असलेला भाजप आपल्या कोणत्या नगरसेविकेला महापौरपदी विराजमान करतात याकरता माध्यमांमध्ये जोरदार स्पर्धा दिसून येत आहे. या पदासाठी भाजपच्या अनेक महिला नगरसेवकांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये भाजपमध्ये निवडणुकीपूर्वी आलेल्या काही नगरसेवकांची नावेही माध्यमांद्वारे चर्चेत आहेत. त्यामुळे या महापौर पदी मूळ भाजपचा नगरसेवक बसवला जाणार की बाहेरून आलेल्यांपैकी कुणा नगरसेविकेला या पदावर बसवणार याची उत्सुकताच मुंबईकरांना लागली आहे. मात्र, बाहेरुन आलेल्या नगरसेवकाला महापौर पदी बसवण्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरु असली तरी भाजप हे पाऊल उचललेल काय याबाबतच जनतेच्या मनात शंका कुशंका निर्माण होवू लागल्या आहेत. त्यामुळे चर्चेत असणाऱ्यांपैंकी कोणती नगरसेविका कॉम्बिनेशनमध्ये सरस ठरते आणि आपल्या गळ्यात महापौरपदाची माळ घालून घेते हे आता पहावे लागेल.

मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसणार आणि यासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग आरक्षित झाल्यानंतर भाजपच्या दोनपासून ते अनेक वेळा निवडून आलेल्या नगरसेविकांची नावे माध्यमांद्वारे चर्चिला जात आहेत. यामध्ये रितू तावडे, राजेश्री शिरवडकर,अलका केरकर, शितल गंभीर, स्वप्ना म्हात्रे, प्रिती सातम, योगिता कोळी, श्रीकला पिल्ले, तेजस्वी घोसाळकर, राखी जाधव, अश्विनी मते आदींची नावे चर्चेत आहेत. भाजपच्या निवडून आलेल्या महिला नगरसेविकांमध्ये अमराठी नगरसेविकांचा समावेश आहे, परंतु मुंबईचा महापौर हा मराठी हिंदूच असेल असे स्पष्ट सांगितल्याने अमराठ नावे ही मागे पडली आहेत.

परंतु, तेजस्वी घोसाळकर, राखी जाधव, अश्विनी मते यांनी विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी पक्षात आलेल्या या नगरसेविकांना महापौरपदी बसवण्याचा विचार पक्ष करणार का असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे. माध्यमांकडून या तिन्ही नावांची चर्चा सुरु आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे नवीन आलेल्या नगरसेवकाचा विचार केला जाणार नसला तरी जर त्या निवडून आलेल्या नगरसेवकामध्ये क्षमता असेल तर पक्ष त्यांचा जरुर विचार करू शकतो,असेही बोलले जात आहे. त्यामुळे जनतेसोबतच भाजपमध्येही अस्वस्थता पसरली आहे. त्यामळे इतर पक्षातून आलेल्यांचा विचार जर पक्षाने केल्यास मूळ भाजपमधील नगरसेवकांवर अन्याय ठरेल अशाप्रकारची भावना जनतेसोबतच कार्यकर्तेही खासगीत व्यक्त करताना दिसत आहेत. सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भाजपचा स्वत:च्या बळावर महापौरपदी बसणारा पहिला महापौर असल्याने यापदावर पक्ष आता विविध कंगोऱ्यांनी विचार करून पुढील अडीच वर्षांमध्ये विरोधी पक्षाला जशास तसे उत्तर देण्याऐवजी सर्वांना सोबत घेवून जाणारा अशी महापौर देईल अशाप्रकारची माहिती मिळत आहे.

त्यादृष्टीकोनातून चर्चेत असलेल्या सर्व नगरसेविकांच्या कामांसह स्वभाव, वर्तन आणि कामकाज करण्याची पध्दती, सभागृहातील संसदीय कायदेप्रणालीचे ज्ञान, वक्तृत्व,आक्रमकता,तसेच मुंबईचे व्हिजन ठेवणारा आणि पक्षाला अभिप्रेत मुंबईचा विकास करणारा महापौर या पदी बसवण्याच्यादृष्टीकोनातून पक्षाची हालचाली आहे.त्यामुळे कुठल्या नगरसेविकेचे या पदासाठी कॉम्बिनेशन जुळून येईल तिच्याच गळ्यात महापौरपदाची माळ पडली जाईल असे बोलले जात आहे

Comments
Add Comment