प्रशासकीय दिरंगाई विरोधात माजी सैनिकांचे उपोषण
पालघर : नगर परिषदेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभारामुळे एका माजी सैनिकाला न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागल्याची बाब समोर आली आहे. घरपट्टी माफी, मालमत्ता नोंदीतील घोळ आणि प्रशासकीय दिरंगाई यांविरोधात माजी सैनिक डॉ. भाऊराव पुंडलिक तायडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
डॉ. तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सन २०१० ते २०२५ या १५ वर्षांच्या काळात घरपट्टी माफीसाठी नगरपरिषदेकडे अनेकदा अर्ज केले. मात्र, प्रशासनाकडून त्यांना एकदाही लेखी उत्तर देण्यात आले नाही. विशेष म्हणजे, या काळात त्यांना एकदाही प्रॉपर्टी टॅक्सचे मागणीपत्र देण्यात आले नाही, त्यामुळे "कर भरायचा तरी कसा?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
डॉ. तायडे यांनी घरपट्टी माफीचा अर्ज केल्यानंतर, त्यांचा जुना प्रॉपर्टी क्रमांक (४०२९) नगरपरिषदेच्या दफ्तरातून आणि संगणक प्रणालीतून अचानक गायब झाला आहे. प्रशासकीय दप्तरातील अधिकृत नोंद गायब होणे, हा अत्यंत गंभीर प्रकार असून यामुळे प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नगरपरिषदेच्या संगणक प्रणालीत डॉ. तायडे यांच्या नावे 'घोलविरा' परिसरात दोन मालमत्तांची चुकीची नोंद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात त्या मालमत्ता त्यांच्या ताब्यात नाहीत. अधिकृत कागदपत्रांवर नाव दाखवून त्यांना कायदेशीर अडचणीत आणले जात असल्याचा आरोप तायडे यांनी केला आहे. "जर त्या मालमत्ता माझ्या नावावर आहेत, तर त्या प्रत्यक्ष माझ्या ताब्यात द्याव्यात," अशी मागणी त्यांनी केली आहे.
देशासाठी सेवा बजावलेल्या माजी सैनिकाला स्वतःच्या हक्काच्या कामासाठी १५ वर्षे पायपीट करावी लागणे आणि अखेर उपोषणास बसावे लागणे, याबद्दल पालघरमधील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता जिल्हा प्रशासन आणि नगर परिषद यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






