पालघर : पश्चिम रेल्वेने उपनगरीय क्षेत्रासाठी १ जानेवारीपासून अमलात आणलेल्या नवीन वेळापत्रकात बहुतांश उपनगरीय गाड्यांची वेळ पूर्वीच्या वेळापत्रकाच्या तुलनेने पाच ते दहा मिनिटे अगोदर करण्यात आले होते. मात्र दैनंदिन प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या अनेक गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे.
पश्चिम रेल्वेच्या नवीन वेळापत्रकात अनेक गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या असून बहुतांश गाड्या या पूर्वीच्या वेळापत्रकाच्या तुलनेत काही मिनिटे लवकर धावत आहेत. बोरिवली व विरार येथे फलाट व रेल्वे रुळांच्या जोडणीचे काम या विलंबामागचे कारण असल्याचे स्थानीय रेल्वे अधिकारी सांगत असले तरी नवीन वेळापत्रकाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने प्रवाशांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे.






