विमानवाहू युद्धनौका इराणच्या सीमेजवळ दाखल
वॉशिंग्टन : इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण चर्चेसाठी उत्सुक असल्याचा दावा केल्यानंतर तेहरानकडून कडक प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “सैनिकांच्या बोटा ट्रिगरवर आहेत,” असा इशारा इराणी अधिकाऱ्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे विध्वंसक विमानवाहू युद्धनौका यूएस अब्राहम लिंकन इराणच्या सीमेजवळ दाखल झाल्याने परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यूएस अब्राहम लिंकन हे अमेरिकेच्या नौदल शक्तीचे प्रतीक मानले जाते. या विमानवाहू जहाजासोबत गाइडेड मिसाइल क्रूझर, डेस्ट्रॉयर, पाणबुड्या आणि सहाय्यक जहाजांचा समावेश असलेला संपूर्ण स्ट्राइक ग्रुप तैनात असतो. या जहाजावर अत्याधुनिक लढाऊ विमाने असून, समुद्र, जमीन आणि आकाशातून एकाच वेळी हल्ले करण्याची क्षमता या ताफ्याकडे आहे.
संरक्षण तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेकडे असलेली बी-२ स्टेल्थ बॉम्बर विमाने, टॉमहॉक क्षेपणास्त्रे, एफ-३५ आणि एफ-२२ ही पाचव्या पिढीची लढाऊ विमाने तसेच एमक्यू-९ रीपर ड्रोन ही इराणसाठी मोठे आव्हान ठरू शकतात. इराणची हवाई संरक्षण व्यवस्था या अत्याधुनिक शस्त्रप्रणालींना रोखण्यात अडचणीची ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.दरम्यान, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने वॉशिंग्टनला थेट इशारा देत आपले सैन्य पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, इस्रायलनेही संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात हाय अलर्ट जाहीर केला असून, पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेत. आयडीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सैन्य तयार असल्याचे सांगितले आहे. या सर्व घडामोडींमुळे मध्यपूर्वेत स्थैर्य धोक्यात आले असून, आंतरराष्ट्रीय समुदायात चिंतेचे वातावरण आहे. राजनैतिक चर्चेतून तोडगा न निघाल्यास परिस्थिती थेट संघर्षाकडे वळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.






