राष्ट्रीय महामार्ग बंद, २० हून अधिक उड्डाणे रद्द
श्रीनगर : जम्मू विभागातील उंच भागांमध्ये शुक्रवारी जोरदार बर्फवृष्टी झाली असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बर्फवृष्टीमुळे जम्मू–श्रीनगर राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच डोंगराळ जिल्ह्यांमध्ये खबरदारी म्हणून शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्रिकुटा पर्वतरांगांवर वसलेल्या माता वैष्णो देवी मंदिर परिसरातही या हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली असून, त्यामुळे यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली. दरम्यान, जम्मू शहरासह मैदानी भागांत झालेल्या मध्यम पावसामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या दीर्घ दुष्काळातून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार गुरुवारी उशिरा सायंकाळपासून उंच भागांमध्ये बर्फवृष्टी सुरू झाली, तर रात्रभर मैदानी भागांत अधूनमधून पाऊस पडत राहिला. या बर्फवृष्टीमुळे २७० किलोमीटर लांबीचा जम्मू–श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग (एनएच-४४) दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याशिवाय मुघल रोड, श्रीनगर–लेह राष्ट्रीय महामार्ग आणि सिंथन रोडही बंद आहेत. रस्ते पूर्णपणे सुरू होईपर्यंत प्रवास टाळण्याचा सल्ला वाहतूक विभागाने प्रवाशांना दिला आहे.
परिस्थितीचा आढावा घेता राजोरी, पुंछ आणि कठुआ जिल्ह्यांच्या डोंगराळ भागांतील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. खराब हवामानाचा सामना करण्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने सर्व जिल्ह्यांमध्ये हेल्पलाईन क्रमांकही जाहीर केले आहेत. कश्मीर खोऱ्याच्या बहुतांश भागांतही बर्फवृष्टी झाली असून, श्रीनगरमध्ये या हंगामातील पहिली बर्फवृष्टी नोंदवण्यात आली आहे. बर्फवृष्टीमुळे श्रीनगर–जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे, तर श्रीनगर विमानतळावरून २० हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत.






