भालचंद्र कुबल : पाचवा वेद
या आठवड्यात पार पडलेल्या ४९ व्या बोधी नाट्यलेखन कार्यशाळेबद्दल आज लिहिणार आहे. या कार्यशाळेची पद्धत थोडी वेगळी आहे. इथे लेखन तंत्र शिकवले जात नाही. इथे शिकवण्याची पद्धत पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा एम. बी. ए.च्या वर्गात ज्या पद्धतीने एखादी ‘केस स्टडी’ अभ्यासली जाते, त्याच पद्धतीने एखादी संहिता तज्ज्ञ मंडळी लेखकाकडून वाचून घेतात आणि मग त्यावर यथोचित चर्चा केली जाते, ज्यामुळे ती संहिता परिपक्व तर बनतेच शिवाय प्रयोगक्षमही बनते. हा आजवरच्या बोधी नाट्यलेखन कार्यशाळेचा रोचक आणि रंजक अनुभव आहे.
प्रेमानंद गज्वी, डाॅ. सुरेश मेश्राम, अशोक हंडोरे यांनी बोधी नाट्य परिषद स्थापन करून त्यामार्फत अखिल महाराष्ट्रात मराठी साहित्य व कलेशी निगडीत असलेले विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. त्यापैकीच नाट्यलेखन कार्यशाळा हा एक बहुचर्चित उपक्रम ठरला. ४९ वी बोधी नाट्यलेखन कार्यशाळा गाजली ती स्त्री लेखिकांच्या वाचन झालेल्या नव्या कोऱ्या संहितांमुळे. कनक रंगवाचा या त्रैमासिकाचा दीर्घांक विशेषांक हल्लीच कणकवलीहून संपादक वामन पंडित यांनी प्रकाशित केला आहे. त्याची दखल घेत बोधी नाट्य परिषदेने त्यातील चार स्त्री लेखिकांच्या दीर्घांकावर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व बोधी नाट्य परिषदेच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मराठी नाटक अधिक समृद्ध व्हावे या हेतूने गेली तेवीस वर्षे सातत्याने महाराष्ट्रभर बोधी नाट्य परिषद, मुंबई ‘नाट्य लेखन कार्यशाळा’ घेत आलेली आहे. या नाट्यलेखन कार्यशाळेत केवळ स्त्री नाटककारांनीच आपली नाटके वाचली. 'ही वाट दूर जाते', (डॉ. अनघा राजपूत, लातूर), 'आस्था', (ऋतुजा आरती बडवे, कोल्हापूर); ‘झुळूक', (मेधा देशमुख, पुणे), 'रेड डाॅट' (उर्मी, कल्याण) ही ती चार नाटके.
स्त्री लेखिकांच्या सामाजिक लेखनामागे मुख्यतः स्वतःच्या अनुभवांमधील वेदना, अस्वस्थता आणि समाजातील अन्याय व्यक्त करण्याची इच्छा असते. मराठी नाट्यलेखनासंदर्भात, हिराबाई पेडणेकर, काशिबाई कानिटकर, शिरीष पै, सई परांजपे, ज्योती म्हापसेकर, सरीता पद्की यांसारख्या लेखिकांनी स्त्रीशिक्षण, लिंगभेद आणि कौटुंबिक मूल्ये यांसारख्या समस्या अधोरेखित करून सामाजिक जागरूकता निर्माण केली. या नाटककारांनी सामाजिक परंपरा, कौटुंबिक संघर्ष आणि स्त्रीस्वातंत्र्य यांसारख्या विषयांना केंद्रस्थानी ठेवून मराठी भाषेला नवे आयाम मिळवून दिले. त्यांच्या नाटकांमधून भारतीय संस्कृती, एकपात्री शैली आणि मुक्त नाट्यप्रयोग यांसारखे नवे तंत्र रूढ झाले, ज्यामुळे मराठी नाटक अधिक वैविध्यपूर्ण झाले. सोनाबाई केरकर ('छत्रपती संभाजी')सारख्या सुरुवातीच्या लेखिकांनी संगीत नाटकांना प्रेरणा दिली. स्त्री नाटककारांच्या अल्प संख्येनेही मराठी रंगभूमीला स्त्री-भावविश्वाची खोली मिळाली, जी पूर्वी पुरुषप्रधान होती. त्यांच्या कार्याने प्रायोगिक रंगभूमीला चालना मिळाली आणि आजच्या पिढीला, उदा. मनस्विनी लता रवींद्र, स्वरा मोकाशी, कल्याणी पाठारे, कविता मोरवणकर, वर्षा दांदळे, आदीना प्रेरणा मिळत आहे.
कार्यशाळेत प्रथम वाचली गेलेली संहिता होती ‘ही वाट दूर जाते.’ यात माधवी या व्यक्तिरेखेची दोन रूपं पाहायला मिळतात. काहीशा फँटॅसीच्या सहाय्याने जाणारे कथाबीज हवी असलेली गोष्ट न मिळाल्याने नैराश्याच्या गर्तेत अडकू शकते आणि त्यावर उपायही आपणच असतो अशा वनलायनरची ही दीर्घांकिका. मुळात पुरुष पात्रांमुळे जीवनात आलेले अस्ताव्यस्त जगणे एखाद्या स्त्रीला, जो रुचेल तो निर्णय घ्यायला भाग पाडते असा एकंदर आशय या नाट्याकृतीतून सादर झाला. अनघा राजपूत या तशा उदयोन्मुख लेखिका; परंतु संवादावर असलेली त्यांची पकड नाट्यवाचन खुलवून गेली. नाटकातील माधवी हे पात्र भूतकाळातल्या माधवीशी संवाद करते तेव्हा वर्तमानातल्या माधवीला त्या घटना माहीत असणारच, या तांत्रिक मुद्यांवर चर्चकांमध्ये चर्चा घडून आली. नोंदवल्या गेलेल्या निरीक्षणांची लेखिकेने दखल घेऊन त्यात सुधारणा करू, अशी ग्वाही दिली.
दुसरी संहिता ऋतुजा आरती बडवे या आताच्या पिढीची ‘आस्था’ या नावाची होती. एका नटीला कॅन्सर पिडीत रुग्णाची भूमिका वाट्याला येते. एका ठरावीक ऊंचीवर ती नेऊन ठेवावी ज्यामुळे प्रेक्षकांकडून वाहवा मिळावी या प्रयत्नात तो कॅन्सर तिच्या घरातच सापडतो. एका कलाकाराच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी अधोरेखित करणारे कथाबीज ऋतुजाने चांगले खुलवले, मुळातच ती कोल्हापूर विद्यापीठात नाट्यशास्त्राची विद्यार्थिनी असल्याने वाचिक अभिनयाची जोड तिच्या वाचनास मिळाली.
तिसरी संहिता उर्मी. (अॅड. शिल्पा सावंत) या लेखिकेची ‘रेड डाॅट’ या नावाची स्त्रीयांच्या मासिकधर्माचे विवेचन करणारी होती. एखाद्या स्त्रीला मासिकधर्म सुरू न झाल्यास मनाची होणारी घालमेल, कुचंबणा, न्युनगंड अशा सर्व विवंचनेने ग्रासलेल्या नायिकेची कथा उर्मीने धाडसाने मांडली आहे. या निमित्ताने चर्चक म्हणून लाभलेले डाॅ. अनिल बांदिवडेकर, डाॅ. स्मिता दातार व डाॅ. अनघा राजपूत हे तिघेही व्यवसायाने मेडिकल प्रॅक्टीशिनर असल्याने या विषयावर सखोल चर्चा घडवून आणली गेली.
चौथी संहिता ‘झुळूक’. पुण्याच्या मेधा देशमुखांची होती. संहिता ऐकल्यावर लेखकांवर असलेला पारंपरिकतेचा दिवाणखानी पगडा केव्हा दूर होणार? याबाबत प्रश्नचिन्हच निर्माण होते. पुरुष सत्ताक प्रवृत्तीचा नायक स्वतःच्या मनमानीने घरातल्या इतर घटकांवर करिअरच्या अानुषंगाने केलेली बळजबरी आणि त्याचा पश्चाताप म्हणजे झुळूक हा दीर्घांक. फारसा संघर्ष नसलेली, जुनाट लेखन संस्कारात मोडणारी ही संहिता बिल्कूल पकड घेऊ शकली नाही.
स्त्री लेखिका, विशेषतः मराठी नाटककार आणि कवयित्री, पुरुष सत्ताक समाजव्यवस्था, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि रंगभूमी व्यवहाराच्या अडचणींमुळे गुरफटतात. नाटक हा परावलंबी प्रकार असल्याने प्रयोग उभा करण्यासाठी पुरुषप्रधान नेटवर्कची गरज भासते, ज्यात सामाजिक पूर्वग्रह आणि कमी संधी येतात. स्त्री-मुक्ती चळवळीनंतरही पुरुष सत्ताक मूल्ये त्यांच्या विचारांवर, भावनांवर नियंत्रण ठेवतात, ज्यामुळे व्यक्तिगत वेदना सार्वत्रिक संघर्षात रूपांतरित होते. या वेदनेचा निचरा व्हावा यासाठीच अशा कार्यशाळा, प्रयोगशाळा म्हणून अमलात आणल्यास स्त्री लेखिकांमधे एक वेगळीच क्रांती घडून येऊ शकेल, या बाबतीत दुमत नाही.






