जूननंतर एल निनो सक्रिय होण्याची शक्यता
नवी दिल्ली : देशात यंदाच्या मान्सूनबाबत चिंताजनक चिन्हे दिसून येत आहेत. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, जूनच्या मध्यात किंवा त्यानंतर पॅसिफिक महासागरात ‘एल निनो’ सक्रिय होण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम भारतातील नैऋत्य मान्सूनवर होऊ शकतो. एल निनोच्या काळात देशात पाऊस कमी होतो आणि उष्णतेत वाढ होते, अशी स्थिती सामान्यतः पाहायला मिळते.
ऑस्ट्रेलियन हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, सध्या पॅसिफिक महासागरात ‘ला निना’ परिस्थिती आहे. मात्र ही प्रवृत्ती हळूहळू कमकुवत होत असून, महासागराच्या पृष्ठभागाखाली उबदार पाणी साचत आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत एल निनो तयार होण्याची शक्यता वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, फेब्रुवारीच्या अखेरीस परिस्थिती तटस्थ (न्यूट्रल) होऊ शकते आणि मार्च ते मे या कालावधीत ती कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र जूनपासून एल निनो सक्रिय होण्याची शक्यता वाढेल. सामान्यतः ला निनानंतर येणारा एल निनो अधिक प्रभावी ठरतो आणि यावर्षीही तसे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विषुववृत्तीय प्रशांत महासागरात एल निनो निर्माण झाला की, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा किमान ०.५ अंश सेल्सिअसने वाढते. यामुळे वाऱ्यांची दिशा व वेग बदलतो आणि त्याचा परिणाम जगभरातील हवामानावर होतो. भारतात याचा सर्वाधिक फटका नैऋत्य मान्सूनला बसतो. वाऱ्यांची दिशा बदलल्याने पावसाचे प्रमाण घटते आणि काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.
भूतकाळातील अनुभवही धोक्याची जाणीव करून देणारे आहेत. १९८६ मध्ये एल निनोमुळे देशाच्या अनेक भागांत तीव्र दुष्काळ पडला होता. २०१४ मध्ये मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा सुमारे १२ टक्क्यांनी कमी झाला होता. तसेच २०२३ मधील एल निनोमुळे शेती क्षेत्रालाही मोठा फटका बसला होता. स्कायमेटचे अध्यक्ष जे. पी. शर्मा यांच्या मते, यावेळी एल निनो हळूहळू विकसित होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मान्सूनवरील परिणाम अधिक गुंतागुंतीचा आणि काही वेळा अधिक धोकादायक ठरू शकतो. दरम्यान, हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की सध्या हे प्राथमिक अंदाज असून, जानेवारी-फेब्रुवारीतील भाकिते पूर्णपणे अचूक मानली जात नाहीत. त्यामुळे पुढील काही महिन्यांतील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
- जूनच्या मध्यात पॅसिफिक महासागरात एल निनो सक्रिय होऊ शकतो.
- त्याच्या प्रभावामुळे भारतात जास्त उष्णता आणि कमी पाऊस पडण्याचा धोका.
- मान्सूनवरील परिणाम अधिक गुंतागुंतीचा आणि धोकादायक असू शकतो.






