मुंबई : २०२५ हे वर्ष भारतातील डिजिटल पेमेंट्ससाठी मैलाचा दगड ठरले असून, भीम पेमेंट्स ॲपने यावर्षी वापरात (अभूतपूर्व) चौपट वाढ नोंदवली आहे. एनपीसीआय भीम सर्व्हिसेस लिमिटेडने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२५ मध्ये ३८.९७ दशलक्ष असलेले मासिक व्यवहार डिसेंबरमध्ये थेट १६५.१ दशलक्षांवर पोहोचले असून, ही वाढ ३०० टक्क्यांहून अधिक आहे. वर्षभरात सरासरी मासिक वाढ सुमारे १४ टक्के राहिली, ज्यामुळे युपीआय-आधारित डिजिटल पेमेंट्समध्ये भीम ॲपची भूमिका अधिक ठळक झाली आहे.
व्यवहारांच्या संख्येबरोबरच त्यांच्या मूल्यामध्येही मोठी वाढ झाली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये भीम अॅपवरील व्यवहारांचे एकूण मूल्य २० हजार ८५४ कोटी रुपयांवर पोहोचले. यावरून वापरकर्ते आता केवळ छोट्या दैनंदिन पेमेंट्सपुरते मर्यादित न राहता मोठ्या रकमेचे व्यवहारही भीमद्वारे करत असल्याचे स्पष्ट होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत व्यवहार संख्येत जवळपास ३९० टक्के तर व्यवहार मूल्यात १२० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
या वाढीत दिल्ली आघाडीवर राहिली आहे. राष्ट्रीय राजधानीत छोट्या रकमेचे, वारंवार होणारे व्यवहार, किराणा खरेदी आणि पीअर-टू-पीअर पेमेंट्स यामुळे भीम ॲपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. एकूण व्यवहारांपैकी २८ टक्के पीअर-टू-पीअर तर १८ टक्के किराणा खरेदीशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे. यावरून भीम अॅप दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालल्याचे चित्र स्पष्ट होते.
भीम ॲपमधील ही वाढ भारताच्या डिजिटल इंडिया मोहिमेला नवी गती देणारी ठरत आहे. छोट्या शहरांपासून ते महानगरांपर्यंत ॲपची पोहोच वाढत असून, भविष्यात युपीआय इकोसिस्टिममध्ये भीमची भूमिका अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. वापरकर्त्यांच्या वाढत्या विश्वासामुळे डिजिटल पेमेंट्सचा प्रसार वेगाने होत असून, भारत डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने अधिक वेगाने वाटचाल करत आहे.






