मोहित सोमण: बार्ट्रॉनिक्स लिमिटेड (Bartronics Limited) कंपनीने आज एक्सचेंज फायलिंगमध्ये एसएनएन (Shree Naga Narasimha Private Limited SNN) कंपनीचे अधिग्रहण करणार असल्याचे स्पष्ट केले. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत, कंपनीने एस एन एन कंपनीचे ५१% अधिग्रहण (Acquisition) करणार असून याविषयी बोलणी सुरू असल्याचे म्हटले आहे. कंपनीने उद्धृत नियमावलीनुसार व इतर कायद्याची अंमलबजावणी करून हे आगामी काळात अधिग्रहण केले जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले. प्राथमिक बोलणी पूर्ण झाली असून याविषयी लवकरच प्रकिया सुरू होईल असेही कंपनीने म्हटले. यापूर्वी कंपनीने ८ जानेवारी २०२६ रोजी दोन्ही कंपन्यात सामंजस्य करार (Memoreundum of Understanding MoU) झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे या कार्याला गती मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कंपनीने यावर जोर दिला आहे की प्रस्तावित व्यवहार लागू कायदे आणि नियामक आवश्यकतांनुसार काटेकोरपणे केला जाईल. हा दृष्टिकोन संपादन प्रक्रियेदरम्यान अनुपालन राखण्याप्रती बार्ट्रॉनिक्स इंडियाची वचनबद्धता दर्शवतो असे कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये निवेदनात म्हटले. बार्ट्रॉनिक्स इंडियाने दोन महत्त्वाच्या टप्प्यांवर स्टॉक एक्सचेंजना योग्य खुलासे करण्याचे वचन दिले आहे ते म्हणजे एसएनएनसोबत निश्चित करारांवर स्वाक्षरी करणे व व्यवहाराशी संबंधित कोणत्याही महत्त्वपूर्ण घडामोडी घडणे असेही कंपनीने यावेळी सांगितले.
कंपनीचा स्टॉक सुरुवातीला आज ३% कोसळला असून सकाळी १०.१७ वाजेपर्यंत हा शेअर २.३६% कोसळत ११.२३ रूपयांवर व्यवहार करत होता. १९९० मध्ये स्थापन झालेली ही भारतीय तंत्रज्ञान कंपनी,ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन अँड डेटा कॅप्चर (AIDC) सोल्यूशन्स, एआय आधारित प्लॅटफॉर्म अथवा व्यासपीठ असून फिनटेक आणि ग्रामीण परिवर्तनासाठी डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये विशेषज्ञता असलेली वित्त, आरोग्यसेवा आणि कृषी यासारख्या विविध क्षेत्रांसाठी स्मार्ट कार्ड, RFID आणि फिनटेक सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करणारी कंपनी आहे. गेल्या ५ दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये १.३१% घसरण झाली असून गेल्या १ महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये ८.१८% व गेल्या वर्षभरात ४५.७४% घसरण झाली असून इयर टू डेट बेसिसवर कंपनीचा शेअर ५.१९% कोसळला आहे. अद्याप कंपनी अधिग्रहणाविषयी आर्थिक माहिती प्रसिद्ध केलेली नाही.
नागनरसिंहा प्रायव्हेट लिमिटेड ही एक भारतीय अन्न प्रक्रिया (Food Processing) आणि ताजी उत्पादने कंपनी (AYOU ब्रँड) कंपनी आहे जी किरकोळ विक्रीसाठी फळे आणि भाज्या एकत्रित करणे, प्रक्रिया करणे आणि पुरवठा करण्यावर आपले लक्ष केंद्रित करते. २०२२ च्या उत्तरार्धात स्थापन झालेली ही कंपनी विविध अन्न उत्पादनांमध्ये कार्यरत आहे.






