सत्र न्यायालयाचा एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना गंभीर इशारा
मुंबई : मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधील नऊ विद्यार्थ्यांनी दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमात सहभाग घेतल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला असला, तरी सत्र न्यायालयाने विद्यार्थ्यांना फटकारले आहे.
सोमवारी या प्रकरणाची सुनावणी करताना विद्यार्थ्यांना थेट इशारा दिला की, “तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा नोकरीवर परिणाम होईल. तुमचे करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं.”
“सरकारी नोकरी मिळणार नाही…”
सुनावणीदरम्यान हे नऊ विद्यार्थी कोर्टरूमच्या मागच्या बाजूला रांगेत उभे होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनोज बी. ओझा यांनी त्यांच्याकडे विचारणा केली. “तुमच्यातले किती जण महाराष्ट्राबाहेरचे आहेत? तुम्ही महाराष्ट्रात शिक्षणासाठी
आलात, आणि हे सगळे करताय? तुमच्या वडिलांना या प्रकरणाची माहिती आहे का?” यानंतर न्यायाधीश म्हणाले, “या केसमुळे तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार नाही. आणि खासगी क्षेत्रात नोकरी करताना देखील तुमच्यावर गुन्हा सुरू असल्याची माहिती द्यावी लागेल.”
न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते म्हणाले,“आता तुमचे गुन्हेगारी रेकॉर्ड तयार झाले आहे. ते केवळ इथल्या पोलिसांकडे नाही, तर देशभरात उपलब्ध असणार आहे. करिअर सुरू होण्याआधीच तुम्ही मोठी चूक केली आहे.”
न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांच्या वकिलांना ते कोणता अभ्यासक्रम शिकत आहेत, हेही विचारले. वकिलांनी सांगितले की हे विद्यार्थी मास्टर ऑफ सोशल वर्क (एमएसडब्ल्यु) करत आहेत. यावर न्यायाधीश म्हणाले की, “तुमच्या डिग्रीमुळे तुम्हाला नोकरी मिळेलच असे नाही. तुम्हाला वाटतेय का की तुम्ही वैज्ञानिक किंवा इंजिनिअर आहात?” असा टोमणा त्यांनी मारला.
दरम्यान, या नऊ विद्यार्थ्यांवर ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल आहे. विद्यार्थ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून प्रकरणाची सुनावणी अजून सुरू आहे.






