मुंबई : पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) जपानच्या ओसाखा सिटी प्रशासनासोबत सामंजस्य करार केला. या कराराद्वारे राज्यातील घनकचरा व्यवस्थापन, जल व हवा प्रदूषण तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम, मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंदर सिंह भा. प्र. से., जपानचे मुंबईतील कॉन्सुलेट जनरल कोजी यागी- सान यांच्या उपस्थितीत ओसाखा सिटी शासनाचे पर्यावरण ब्युरो शुनसुके कावाबे, ग्लोबल इंन्व्हायरमेंट सेंटर जपानचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी आकीको डोई, तोमोया मोटोडा, नकाजिमा नाओ, चिका काटा ओका, सुनिची होंडा, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सांमज्यस करार करण्यात आला आहे. १९६० च्या दशकात औद्योगिकीकरणामुळे जपानमध्ये प्रदूषणाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. ओसाखा सिटीने कडक कायदे, प्रभावी अंमलबजावणी आणि लोकसहभागाद्वारे जल, हवा, घनकचरा आणि कार्बन उत्सर्जन नियंत्रणात यश मिळवले असून ते आज जागतिक रोल मॉडेल मानले जाते. या कराराअंतर्गत तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण, कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि अभ्यासगट राबवले जातील. सिंगल-यूज प्लास्टिक पुनर्वापर, घनकचरा प्रक्रिया आणि प्रदूषण नियंत्रणासाठी ओसाखा सिटी प्रशासन महाराष्ट्राला मदत करणार आहे. या माध्यमातून राज्यात हरित पर्यावरण निर्मितीस मोठा हातभार लागेल, असे अध्यक्ष कदम यांनी सांगितले.






