श्रद्धा जाधव यांची क्षमता, तरी दाखवला अविश्वास
मुंबई : मुंबई महापालिकेत उबाठाच्या नेतेपदी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची गटनेतेपदी निवड केली आहे. पेडणेकर यांची गटनेतेपदी निवड केल्यामुळे हा पक्ष विरोधी पक्षात बसल्यास त्यांची निवड विरोधी पक्षनेतेपदी विराजमान होवू शकतात. त्यामुळे किशोरी पेडणेकर या भविष्यात विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यास भाजप तसेच शिवसेनेसाठी फुलटॉस ठरणार आहे. किशोरी पेडणेकर यांना विरोधी पक्षनेतेपद सिध्द करण्याची संधीच दिली जाणार नसून भाजपा आणि शिवसेनेच्या आरोपापुढे पेडणेकरांचा निभाव कसा लागतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. पण पेडणेकरांना गटनेतेपद निवडल्याने पुन्हा एकदा किचन कॅबिनेट यशस्वी ठरल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ८९, उबाठा ६५, शिवसेना २९, काँग्रेस २४, एमआयएम ०८, मनसे ०६, राष्ट्रवादी काँग्रेस ०३, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) ०१, समाजवादी पक्षाचा ०१ अशाप्रकारे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेना महायुतीमध्ये एकूण ११८ नगरसेवक निवडून आल्यानंतर त्याखालोखाल उबाठाचे सर्वाधिक ६५ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाची मते उबाठाला असून या पक्षाच्यावतीने सर्व नगरसेवकांची नोंदणी कोकण भवनमध्ये पार पडली. यामध्ये उबाठाच्यावतीने गटनेते पदी किशोरी पेडणेकर यांची निवड केली आहे.
उबाठाच्या गटनेतेपदासाठी माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी महापौर विशाखा राऊत, माजी महापौर श्रध्दा जाधव, माजी महापौर मिलिंद वैद्य, ज्येष्ठ नगरसेवक रमाकांत रहाटे, यशोधर फणसे ,सचिन पडवळ यांच्या नावाची चर्चा होती. परंतु आजवर श्रध्दा जाधव या वगळता इतरांनी सत्ता काळात नगरसेवक पद भूषविले असून केवळ श्रध्दा जाधव यांनी १९९२ ते १९९७ चा विरोधी पक्षात बसून विरोधी पक्षाचा कारभारही अनुभवला होता. यातील किशोरी पेडणेकर यांच्यावर कोविड काळातील भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, तर विशाखा राऊत यांनी यापूर्वी सभागृहनेतेपद भूषवले आहे. त्यात त्यांना चमक दाखवता आलेली नाही. तर यशोधर फणसे हे यापूर्वी सभागृहनेतेपद भूषवले असले तरी मागील नगरसेवक कालावधीत ते नव्हते. तर रहाटे आणि वैद्य यांची मवाळ भूमिका तसेच सचिन पडवळ हे मागील निवडणुकीत निवडून आलेले नगरसेवक असले तरी पाच वर्षांच्या कालावधीतील निम्मा कालावधी कोविड कालावधीत गेला. त्यामुळे संसदीय कार्यप्रणालीचा त्यांना अजुन काही अनुभव घेण्याची गरज आहे. त्यामुळे यासर्व नावांमध्ये श्रध्दा जाधव हे एकमेव असे नाव जे विरोधी पक्षनेतेपदासाठी योग्य होते आणि सभागृहात जर प्रभाकर शिंदे हे सभागृहनेतेपदी येणार असतील त्यांच्यासमोर तोडीस तोड विरोधी पक्षनेता म्हणून श्रध्दा जाधव यांच सामना करू शकत होत्या.






