साऱ्या जगात मनमानी पद्धतीने हस्तक्षेप करण्यासाठी भौगोलिकदृष्ट्या मोक्याच्या जागा आपल्या ताब्यात हव्यात, ही त्यांना लागलेली आस साम्राज्यवादाचं ढळढळीत लक्षण आहे. ट्रम्प यांची खरी आगपाखड ब्रिटनविरोधात नाही. ती भारताविरोधात आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांना भारताने पटवलं आणि त्यांच्याकडून एक संपूर्ण द्विपसमूह काढून घेतला, ही बाब ट्रंप यांना बोचते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जी घातक रूपं जगासमोर आली आहेत, त्यातलं सगळ्यात ठळक रूप आहे, विक्षिप्त साम्राज्यवाद्याचं. जगाने अॅडॉल्फ हिटलर या जर्मनीच्या क्रूरकर्मा, विक्षिप्त साम्राज्यवाद्याला पाहिलं आहे. त्याच्याविषयी भरपूर साहित्य आणि अभ्यास उपलब्ध आहे. त्यावर असंख्य चर्चासत्रं झडली आहेत. साम्राज्यवादी विक्षिप्त असतात, की विक्षिप्त सर्व सत्ताधीश झाल्यानंतर साम्राज्यवादी होतात, याचे उत्तर मानसतज्ज्ञांनी त्यात दिलं आहे. ट्रम्प यांच्या निमित्ताने त्या साऱ्या अभ्यासावरील धूळ पुन्हा एकदा झटकण्याची वेळ आली आहे, असं दिसतं. ग्रीनलँडसाठी डेन्मार्कला धमकावल्यानंतर ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता हिंद महासागरातील दिएगो गार्सिया या बेटाकडे वळली आहे. मॉरिशसवरील ताबा सोडताना इंग्लंडने दिएगो गार्सिया हे बेटही मॉरिशसकडे सुपूर्द केलं, यावरून ट्रम्प यांनी मंगळवारी ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टॅमर यांचे कान उपटले. गंमत म्हणजे, हे दिएगो गार्सिया बेट ज्या चागोस द्विपसमूहाचा भाग आहे, त्या द्वीपसमूहाबाबत गेल्याच वर्षी मे महिन्यात ब्रिटन आणि मॉरिशसमध्ये झालेल्या सामंजस्य करारावरून ट्रम्प यांनी स्तुतिसुमनं उधळली होती. 'ऐतिहासिक घटना' असं त्यांनी त्या करार प्रक्रियेचं वर्णन केलं होतं. घटनेला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच तो सामंजस्य करार ट्रम्प यांना ब्रिटनचा मूर्खपणा वाटू लागला आहे. ब्रिटनने आपल्या 'सुरक्षेशी केलेली तडजोड' या शब्दात ट्रम्प यांनी परवा आगपाखड केली. डावोसला रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी मंगळवारी तीन गोष्टी केल्या : १) कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बनवलेल्या नकाशात त्यांनी ग्रीनलँड, कॅनडा आणि व्हेनेझुएला या तीन स्वतंत्र भूभागांना अमेरिकेच्या नकाशाचा भाग बनवून टाकलं! २) फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रों यांनी ट्रम्प यांना पाठवलेल्या खासगी मेसेजना उघड केलं. राजनैतिक संकेतांचा हा मोठा भंग मानला जातो. ३) चागोस द्वीपसमूह मॉरिशसला दिल्याबद्दल त्यांनी ब्रिटनला बोल लावले. या द्वीपसमूहातील दिएगो गार्सिया हे बेट आपल्याला हवं, अशी उघड मागणी त्यांनी केली.
हे दिएगो गार्सिया बेट ब्रिटनने मॉरिशसकडे सोपवण्यामागे भारताची महत्त्वाची भूमिका आहे. हिंद महासागरात चीनला शह देण्यासाठी जागोस द्वीपसमूह मॉरिशसकडे असणं भारताच्या त्यातल्या त्यात सोयीचं असल्याने हा द्वीपसमूहही ब्रिटनने मॉरिशसचा ताबा सोडतानाच मॉरिशसला द्यावा, यासाठी विशेष प्रयत्न केले होते. दोन शतकांपेक्षा अधिक काळ ब्रिटनच्या अधिपत्याखाली असलेला मॉरिशस जेव्हा स्वतंत्र झाला, तेव्हा ब्रिटनने मॉरिशस सोडताना जो करार केला, त्यात दिएगो गार्सिया हे बेट मॉरिशसला दिलं, पण ९९ वर्षांच्या कराराने ते वापरण्यासाठी पुन्हा आपल्या ताब्यात घेतलं. या करारांमध्ये येती ९९ वर्षे तिथे ब्रिटन आणि अमेरिकी सैन्याचा तळ राहणार असला, ते ब्रिटनलाच वापरायला मिळणार असलं, तरी बेटावर मालकी हक्क मॉरिशसचाच राहणार आहे. ट्रम्प यांना हे मान्य नाही. त्यांच्या मते, या बेटाची; संपूर्ण चागोस द्वीपदी समूहाची मालकी आपल्याकडेच असायला हवी. आपली इच्छा त्यांनी आंतरराष्ट्रीय संकेतांच्या विपरीत, विक्षिप्तपणे मांडली असली, तरी या इच्छेतून त्यांच्यातला साम्राज्यवादीच डोकावतो आहे, हे लक्षात घ्यायला हवं. दिएगो गार्सिया हे हिंद महासागरातल्या चागोस द्वीप समूहातील साधारण ३० चौरस किलोमीटरचं. पण, हे बेट अशा मोक्याच्या जागी आहे, की या बेटावरून अमेरिका - ब्रिटनचं सैन्य एकाच वेळी आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तीनही खंडांवर नजर ठेवू शकतं. बहुतेक सगळी तेलवाहू जहाजही मलाक्का आणि हार्मुज या सामुद्र धुनीतूनच प्रवास करतात. दिएगो गार्सिया बेट ताब्यात असेल, तर या जहाजांचा मार्ग केव्हांही रोखता येतो. म्हणजे, जगाच्या तेल पुरवठ्यावर नियंत्रण ठेवून सगळ्यांना वेठीस धरण्याची क्षमता प्राप्त होते! शिवाय, या द्वीपसमूहाच्या सागरी हद्दीत नांगरून ठेवलेली अमेरिकेची क्षेपणास्त्रवाहू जहाजं जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात वेगाने पोहोचू शकतात. इतकं महत्त्वाचं बेट ब्रिटनने मॉरिशसला दिलं आणि वार्षिक १०१ दशलक्ष पाऊंडाच्या भाडेकराराने ते पुन्हा ९९ वर्षांसाठी आपल्याकडे ठेऊन घेतलं. म्हणजे, आपल्या घरात आपणच भाडेकरू होण्याचा प्रकार. ट्रम्प यांना संताप अनावर झाला आहे तो त्यामुळे. साऱ्या जगात मनमानी पद्धतीने हस्तक्षेप करण्यासाठी भौगोलिकदृष्ट्या मोक्याच्या जागा आपल्या ताब्यात हव्यात, ही त्यांना लागलेली आस साम्राज्यवादाचं ढळढळीत लक्षण आहे.
ट्रम्प यांची खरी आगपाखड ब्रिटनविरोधात नाही. ती भारताविरोधात आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांना भारताने पटवलं आणि त्यांच्याकडून एक संपूर्ण द्वीपसमूह काढून घेतला, ही बाब ट्रम्प यांना बोचते आहे. भारताने पुढे जाऊन मॉरिशसला हाताशी धरून या दिएगो गार्सिया बेटाजवळच असलेल्या अगालेगा बेटावर आपल्या सैन्याच्या हालचालींसाठी काही सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. मॉरिशसला भागीदार करून भारताने चागोस द्वीपसमूहालगत एक उपग्रह संपर्क तळही उभारण्याचं नक्की केलं आहे. त्यासाठी मॉरिशसबरोबर करारही झाला आहे. या संपर्क तळावरून भारताला अमेरिका आणि चीन या दोघांच्याही हालचालींवर लक्ष ठेवणं शक्य होणार आहे. जगात कुठेही कोणीही आपल्या सुरक्षेचा स्वतंत्र विचार करायचाच नाही; सगळ्यांनी अमेरिकेच्या तालावरच नाचावं ही ट्रम्प यांची इच्छा संपूर्ण जगात असंतोष पसरवते आहे. संपूर्ण युरोप त्यांच्याविरोधात एकजुटीने उभा राहण्याची तयारी करतो आहे. युरोपीय समूहाच्या अध्यक्ष उर्सुला वान डेर लेयन, ग्रीनलँडचे अध्यक्ष जेन्स फ्रेडरिक नेल्सन, डेन्मार्कच्या मंत्री मेरी विएरे यांची गेल्या दोन दिवसांतली वक्तव्यं त्याची साक्ष आहेत. आशिया खंडात भारताचे शेजारी ट्रम्प यांच्यासमोर नांग्या टाकणारे असल्याने भारताची स्थिती थोडी अवघड आहे. भारत-चीन यांच्या संबंधात जी सुधारणा होते आहे, त्याचं कारणही ट्रम्पच आहेत. एका साम्राज्यवाद्याला रोखण्यासाठी भारताला दुसऱ्या छुप्या साम्राज्यवाद्याशी मैत्री करावी लागते आहे.






