उल्हासनगर : महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत लागलेल्या चढाओढीमध्ये अखेर शिवसेनेने बाजी मारली आहे. कोकण भवन येथे झालेल्या अधिकृत नोंदणीत शिवसेनेने ४० नगरसेवकांचे संख्याबळ दाखवून बहुमताचा आकडा पार केला. शिवसेनेच्या गटनेतेपदी अरुण आशान यांची नियुक्ती झाली असून यामुळे शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उल्हासनगर महापालिकेत सत्तेसाठी ४० या जादूई आकड्याची गरज होती. निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. महापालिकेत भाजप-३७, शिवसेना-३६, वंचित बहुजन, आघाडी- २, साई पक्ष-१, काँग्रेस-१, अपक्ष -१ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपकडे ३७ नगरसेवक असल्याने ते सत्तेच्या जवळ होते, मात्र शिवसेनेने अत्यंत प्रभावीपणे इतर छोट्या पक्षांना आणि अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले.
शिवसेनेचे- ३६, वंचित बहुजन आघाडीचे २, साई पक्षाचा १ आणि १ अपक्ष यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. या युतीमुळे शिवसेनेचे एकूण संख्याबळ ४० वर पोहोचले आहे. कोकण भवन येथे या ४० नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी शिवसेना म्हणून करण्यात आली, अशी माहिती नवनिर्वचित गटनेते अरुण आशान यांनी दिली. या सर्व घडामोडींनंतर अरुण आशान यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. महापालिकेत पक्षाची ध्येयधोरणे राबवणे आणि ४० नगरसेवकांच्या गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर असणार आहे.
महापौरपदाचा मार्ग मोकळा
भाजप ३७ जागांवर अडकल्याने आणि शिवसेनेने बहुमताचा ४०चा आकडा गाठल्याने आता उल्हासनगरच्या महापौरपदावर शिवसेनेचा दावा भक्कम झाला. यामुळे भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागण्याची शक्यता असून शहरात आता शिवसेनेची सत्ता येण्याचे संकेत मिळत आहेत.






