Wednesday, January 21, 2026

मुंबईत उबाठाचा पहिला नगरसेवक फुटला

मुंबईत उबाठाचा पहिला नगरसेवक फुटला

सरिता म्हस्के शिवसेनेच्या संपर्कात; कल्याण-डोंबिवलीत ११ पैकी ४ नगरसेवक फुटले

मुंबई : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील ४ नगरसेवक फुटल्यानंतर उबाठा गटाला मुंबईतही मोठा धक्का बसला आहे. वॉर्ड क्रमांक १५७ मधील उबाठाच्या नगरसेविका सरिता म्हस्के दोन दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असून, त्या शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे समजते.

कोकण विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी करण्याआधी उबाठा गटाकडून मंगळवारी सर्व नगरसेवकांना संपर्क करण्यात आला. मूळ कागदपत्रांसह बुधवारी शिवसेना भवनात बैठकीसाठी दाखल व्हावे, असा मातोश्रीचा आदेशही कळविण्यात आला. परंतु, मंगळवारी दिवसभर म्हस्के दाम्पत्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांना देखील संपर्क करण्यात आला. मात्र, सरिता म्हस्के कुठे आहेत, याबाबत कोणालाही माहिती नव्हती. बुधवारी दुपारपर्यंत त्यांचाशी संपर्क न झाल्याने उबाठा गटाने इतर नगरसेवकांची गटनोंदणी करून घेतली. तर, गटनेता म्हणून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची निवड करण्यात आली.

दरम्यान, सरिता म्हस्के या शिवसेनेच्या गळाला लागल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांना अपात्र करण्याची कार्यवाही उबाठा गटाकडून सुरू झाली आहे.

कल्याणमध्ये चार नगरसेवक फुटले

कल्याण डोंबिवली महापालिकेतील उबाठाचे ११ पैकी चार नगरसेवक फुटले असून, ते शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे मनसेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला पाठिंबा देत, सत्तेत बसण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी कोकण भवन येथे शिंदेंच्या नगरसेवकांनी आपला गट स्थापन केला. याचवेळी मनसेच्या नगरसेवकांनीही आपला गट स्थापन करत शिवसेनेला पाठिंबा दिला. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणी प्रक्रियेच्या दरम्यान शिवसेनेच्या ५३ नगरसेवकांसोबत मनसेचे ५ नगरसेवक देखील उपस्थित होते.

मनसेने आपला गटनेता म्हणून ज्येष्ठ नेते प्रल्हाद म्हात्रे यांची निवड केली. तत्पूर्वी कोकण भवनात खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील यांची एकत्रित बैठक झाली. त्यानंतर मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिल्याची घोषणा श्रीकांत शिंदे यांनी केली. मनसेने विरोधात निवडणूक लढवूनही त्यांच्याबरोबर युती का? या प्रश्नाचे उत्तर देताना खासदार शिंदे म्हणाले, आम्ही निवडणूक वेगवेगळी लढली असली तरी कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी जे बरोबर येतील त्यांना एकत्र घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. विरोध नसेल तर विकासातही अडचण येत नाही. मनसेचे नेते राजू पाटील माझे मित्र आहेत. त्यांनी विकासासाठी महायुतीला समर्थन दिल्याचे ते म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >