Wednesday, January 21, 2026

वाडा-भिवंडी-मनोर महामार्गाची दुरवस्था

वाडा-भिवंडी-मनोर महामार्गाची दुरवस्था

ओव्हरलोड वाहनांमुळे रस्ते खिळखिळे, प्रशासन सुस्त

वाडा : वाडा-भिवंडी-मनोर या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या महामार्गावर नियमबाह्य वजन वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांनी उच्छाद मांडला आहे. क्षमतेपेक्षा तिप्पट-चौपट ओझे लादलेले ३० ते ४० टनांचे ट्रक आणि कंटेनर या मार्गावरून बेधडक धावत असल्याने सर्वसामान्यांचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. प्रशासनाच्या डोळ्यांदेखत सुरू असलेल्या या 'ओव्हरलोड' साम्राज्यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून नागरिक दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत.

हा महामार्ग प्रामुख्याने ग्रामीण भागातील दळणवळणासाठी असून त्याची क्षमता साधारण ८ ते १२ टन वजनासाठी आहे. मात्र, औद्योगिक क्षेत्रातील अवजड मालाची वाहतूक करणाऱ्या डंपर आणि कंटेनरनी या रस्त्याची वाट लावली आहे. सिमेंट काँक्रीटचा रस्ता असूनही सततच्या प्रचंड वजनामुळे रस्ता जागोजागी खचला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. अरुंद रस्ता आणि त्यात हे अवजड 'राक्षस' यामुळे दुचाकीस्वार आणि लहान वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक वाहने केवळ क्षमतेपेक्षा जास्त वजनच भरत नाहीत, तर वेगमर्यादेचेही उल्लंघन करत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी बेकायदेशीर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रात्रीच्या अंधारात भरधाव वेगाने जाणाऱ्या या वाहनांमुळे अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. "अपघात झाला की पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग धाव घेतात, काही वेळ तपासणीचे नाटक होते आणि पुन्हा परिस्थिती 'जैसे थे' होते, असा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. वाहतूक पोलीस आणि आरटीओ विभाग या ओव्हरलोड वाहनांवर ठोस कारवाई का करत नाही? असा सवाल आता विचारला जात आहे. कारवाई केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष रस्त्यावर दिसावी, अशी मागणी जोर धरत आहे. जर ओव्हरलोड वाहतुकीवर तातडीने नियंत्रण मिळवले नाही आणि रस्त्याची दुरुस्ती केली नाही, तर भविष्यात मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

Comments
Add Comment