Wednesday, January 21, 2026

भारत - यूएई करारांवर शिक्कामोर्तब

भारत - यूएई करारांवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचा भारताचा अल्पकालीन महत्त्वपूर्ण दौरा सोमवारी सायंकाळी पार पडला. सायंकाळी ४.३० वाजता ते दिल्लीतील पालम विमानतळावर दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारून अभिवादन केले व एकाच वाहनातून पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

यानंतर लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी शेख नाहयान आणि त्यांच्या कुटुंबीयांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील नक्षीकाम केलेला लाकडी झुला आणि काश्मिरी पश्मीना शाल चांदीच्या डब्यातून भेट दिली, ज्यातून भारताची हस्तकला व हातमाग परंपरा अधोरेखित झाली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये दहशतवादविरोधी सहकार्य, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण आणि गुंतवणूक या मुद्द्यांवर चर्चा झाली. आखातातील भू-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

मी माझ्या भावाला घेण्यासाठी आलो होतो : पंतप्रधान मोदी पंतप्रधान मोदींनी विमानतळावरील स्वागताचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना अल नाहयान यांचा उल्लेख 'माझे भाऊ' असा केला. भारत आणि यूएई यांच्यातील अतुट मैत्रीला ते किती महत्त्व देतात, हे त्यांच्या या भेटीवरून स्पष्ट होते. त्यांच्याशी होणाऱ्या चर्चेसाठी मी उत्सुक आहे, अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींनी अरबी भाषेतही पोस्ट लिहून या भेटीचे महत्त्व अधोरेखित केले.

Comments
Add Comment