Tuesday, January 20, 2026

बुडत्याचा पाय खोलात

बुडत्याचा पाय खोलात

मीनाक्षी जगदाळे

संक कॉस्ट फॅलसी ही मानवी वर्तणुकीशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची मनोवैज्ञानिक संकल्पना आहे. साध्या शब्दात सांगायचे तर, एखाद्या गोष्टीवर, व्यक्तीवर आपण आधीच खूप वेळ, पैसा किंवा शक्ती खर्च केली आहे, फक्त याच कारणास्तव ती गोष्ट पुढे चालू ठेवण्याच्या वृत्तीला 'संक कॉस्ट फॅलसी' असे म्हणतात. या संकल्पनेचा सविस्तर आढावा आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे घेऊ शकतो.

संक कॉस्ट म्हणजे काय? तर

असा आर्थिक भावनिक, मानसिक, शारीरिक खर्च जो आधीच झालेला आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत परत मिळवता येणार नाही अथवा वसुल होण्याची अजिबात शक्यता नाही. उदा. तुम्ही विकत घेतलेले सिनेमाचे तिकीट, एखाद्या व्यवसायात गुंतवलेले भांडवल किंवा एखाद्या नात्यात दिलेला वेळ, एखाद्या शिक्षणासाठी घेतलेला प्रवेश हा खर्च 'गेला तो गेला' या स्वरूपाचा असतो. ही 'फॅलसी' (तर्कदोष) का आहे? यावर विचार केल्यास समजते की तर्कशास्त्रानुसार, भविष्यातील निर्णय घेताना फक्त भविष्यात होणारा आर्थिक, भावनिक तथा मानसिक फायदा आणि तोटा यांचा विचार करायला हवा. मात्र, आपण अनेकदा जुन्या गुंतवणुकीचा विचार करून चुकीचे निर्णय घेतो.

जेव्हा आपण "मी यात आधीच इतके पैसे घालवले आहेत, आता मागे फिरून कसे चालेल?" असा विचार करतो, तेव्हा आपण या तर्कदोषाला बळी पडतो. यामुळे आपण अधिक नुकसान सोसतो, ज्याला 'बुडत्याचा पाय खोलात' असेही म्हणता येईल.

ही संकल्पना समजून घेण्यासाठी काही उदाहरणे पहिल्यास आपल्याला विषय समजायला अधिक मदत होईल. आपण चित्रपटाचे उदाहरण घेऊया. समजा तुम्ही २०० रुपये देऊन एका चित्रपटाचे तिकीट काढले, चित्रपट सुरू झाल्यावर अर्ध्या तासातच तुमच्या लक्षात आले की तो अत्यंत कंटाळवाणा आहे. आता तुमच्याकडे दोन पर्याय आहेत एक तर तिथून उठून जाणे आणि आपला वेळ वाचवणे, दुसऱ्या कामाला सुरवात करणे किंवा "पैसे खर्च झाले आहेत" म्हणून डोकेदुखी सहन करत पूर्ण चित्रपट पाहणे. जर तुम्ही चित्रपट पाहण्याचे ठरवले, तर तुम्ही तुमचे पैसे तर गमावलेच आहेत, पण सोबत पुढील वेळही वाया घालवत आहात.

अनेकदा व्यवसाय, बिजनेस किंवा प्रकल्प! म्हणजे एखादा प्रकल्प तोट्यात चालला असेल आणि त्यात सुधारणेची शक्यता नसेल, तरीही "आतापर्यंत यात कोट्यवधी रुपये लावले आहेत" या विचाराने त्यात अजून पैसा ओतणे म्हणजे संक कॉस्ट फॅलसी होय. इतके वर्ष एखादा कार्यक्रम करत आलोय पण दरवर्षी तोट्यातच गेलोय तरीही परत परत कितीही तोटा झाला तरी वर्षानुवर्षे तो कार्यक्रम मोठेपणासाठी अथवा दिखाव्यासाठी सुरू ठेवणे हे देखील संक कॉस्ट फॅलसीचे उदाहरणं आहे. जसे की एखादे मंडळ दरवर्षी एखादा सण, उत्सव अथवा सांस्कृतिक कार्यक्रम स्वतःची छाप पाडायला करत आहे, पण दरवर्षी त्यांना कोणी देणगी देत नाही, वर्गणी देत नाही, आर्थिक मदत करत नाही पण सगळे एकत्र येऊन त्यांच्या कार्यक्रमात मजा करायला मात्र जमा होतात. कार्यक्रमांचा आनंद घेणे, बक्षीस मिळवणे, जेवणावर यथेच्छ ताव मारणे असे वागतात. मंडळाला मात्र यातून काहीच मिळत नाही पण स्वतःचे पैसे टाकून कार्यकर्ते सगळं नियोजन करत राहतात. जास्तीतजास्त दोन वर्ष लोकांची वागणूक बघून इथे हा उपक्रम बंद केला पाहिजे, पण मंडळातील लोकांना त्यांचा अहंकार, मोठेपणाची नशा अस करू देत नाही आणि सर्व पदाधिकारी स्वतःचे पैसे गमावून बसतात.

चुकीचे नातेसंबंध हे अगदी वास्तविक उदाहरणं आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळते. अनेकदा लोक अशा नात्यात अडकून राहतात जिथे त्यांना आनंद मिळत नाही. ‘आम्ही १० वर्षे सोबत आहोत.’ हे एकमेव कारण पुढे करून ते नाते ओढत राहतात, ज्यामुळे भविष्यातील सुखाची संधी ते गमावतात. मी लग्न केले आहे आता कितीही कटू अनुभव आले तरी हा निर्णय बदलता येणार नाही म्हणून आयुष्यभर जोडीदाराशी तडजोड करत राहणे, इतर कोणतेही नातेसंबंध ज्यात अनेकदा आपला आर्थिक तोटा झाला आहे, ते निभावत राहणं जसे की भागीदारीचे व्यवसाय, मित्र-मैत्रिणीतील नाते याचे उदाहरण होऊ शकते. अनेकदा ग्रुपमधील एकच व्यक्ती सगळ्यांच्या खाण्यापिण्याचा, फिरण्याचा, खरेदीचा खर्च मैत्रीखातर करत राहते. एखादी व्यक्ती बदलेल, सुधरेल या आशेवर एकतर्फी त्याच्यासाठी आर्थिक, भावनिक नुकसान सहन करत राहणं इथे पाहायला मिळते. त्याच्यासाठी कोणीच कधी खिशात हात घालत नाही. तरीही आजपर्यंत यांच्यासाठी इतकं केल मग आता नाही कस म्हणू? या प्रेमापोटी त्याच व्यक्तीने अजून आर्थिक हानी सोसत राहणं हे सुद्धा संक कॉस्ट फॅलसीचे उदाहरण आहे. वास्तविक त्या व्यक्तीने या ग्रुप शी स्पष्ट चर्चा केली पाहिजे अथवा त्यातून बाहेर पडलं पाहिजे.

मानवी स्वभाव आणि ही फॅलसी

मानवाला 'तोटा' सहन करण्याची भीती (Loss Aversion) वाटते. आपण केलेल्या गुंतवणुकीचा कचरा होऊ नये, अथवा आधी केलेला खर्च वाया जावू नये अथवा आजपर्यंत या गोष्टीवर अथवा या व्यक्ती वर खर्च करत आलोय आता मध्येच थांबलो तर आजपर्यंत जे केल आहे त्यावर पाणी फिरेल या भावनेतून आपण चुकीच्या गोष्टींना, चुकीच्या लोकांना चिकटून राहतो. स्वतःला चुकीचे सिद्ध करणे आपल्याला कठीण जाते, त्यामुळे आपण आपली चूक सुधारण्याऐवजी ती रेटून नेण्याचा प्रयत्न करतो. आपण चुकलो होतो किंवा चुकत आहोत हे स्वीकारनेच मुळात आपल्यासाठी अवघड असते. आपणच आपल्याला समजावत राहतो आणि अजून भावनेच्या आहारी जावून गोत्यात येतो.

प्रत्येकाच्या बाबतीत या सारखे काही न काही प्रकार घडतं असतात म्हणून यातून बाहेर कसे पडायचे? हे माहित असणे अत्यंत महत्वाचे आहे.

भूतकाळ सोडा, भविष्याचा विचार करा. निर्णय घेताना "आजपासून पुढे काय?" हा प्रश्न स्वतःला विचारा. जुना खर्च विसरून जा कारण तो परत मिळणार नाहीये अथवा वसुल करता येण्यासारखा नाहीये. संधी खर्च (Opportunity Cost) ओळखा म्हणजेच तुम्ही एका चुकीच्या गोष्टीला वेळ देत असाल, तर त्यावेळेत तुम्ही दुसरी कोणती चांगली गोष्ट करू शकला असता, याचा विचार करा. जसे की एखाद्या नात्यात आपण आपला पैसा तर खर्च करतोच सोबत आपला वेळ पण त्या व्यक्तीवर खूप खर्च होतो ज्यातून आपल्याला काहीही मिळत नसतं. हे सर्व जेव्हा समजत तेव्हा खूप उशीर झालेला असतो. अनेक अशी नाती असतात ज्याला काही नाव नसतं, काही आधार नसतो, कोणा एकाचं खूप नुकसान होत असतं पण ते सांगण्याची अथवा बोलून दाखवण्याची हिंमत होत नाही.

यातून बाहेर पाडण्यासाठी समुपदेशक, मार्गदर्शक अथवा तज्ज्ञांचा सल्ला वेळेत घ्या. बाहेरील व्यक्ती तुमच्या मनाशी, गुंतवणुकीशी भावनिकदृष्ट्या जोडलेली नसते, त्यामुळे ती तुम्हाला वस्तुनिष्ठ सल्ला देऊ शकते. निरपेक्ष पणे आपल्या चुका आपल्याला दाखवणे आणि त्या कशा सुधरवायच्या यावर उपाययोजना सांगणे व्यावसायिक व्यक्तीला शक्य होते.

सन कॉस्ट फॅलसी आपल्याला भविष्यात प्रगती करण्यापासून रोखते. जे गेले ते परत येणार नाही, हे स्वीकारणे कठीण असले तरी तेच शहाणपणाचे असते. जीवनातील निर्णय घेताना भूतकाळातील गुंतवणुकीपेक्षा भविष्यातील परिणामांना महत्त्व दिले, तर आपण मोठे आर्थिक आणि मानसिक नुकसान टाळू शकतो.

'संक कॉस्ट फॅलसी' दैनंदिन जीवनात कशी काम करते?

अर्धवट राहिलेले शिक्षण किंवा कोर्स समजा तुम्ही एका कठीण प्रोफेशनल कोर्सला प्रवेश घेतला आहे. दोन वर्षे अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात आले की, तुम्हाला या विषयात अजिबात रस नाही आणि या क्षेत्रात तुमचे करिअर घडण्याची शक्यताही कमी आहे. तरीही तुम्ही विचार करता, "मी आधीच दोन वर्षे आणि पाच लाख रुपये खर्च केले आहेत, आता सोडून दिले तर ते वाया जातील."

या विचाराने तुम्ही उरलेली दोन वर्षेही त्यात घालवता. परिणामी, तुम्ही तुमची जुनी गुंतवणूक वाचवण्याच्या नादात भविष्यातील दोन वर्षे आणि अधिकचे पैसे वाया घालवता, जे तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात वापरू शकला असता. न आवडणाऱ्या अभ्यासक्रमात पैसे गुंतवल्यामुळे त्यातील तुमच्या भविष्यातील यशाला धोका असतो, मनाशी तडजोड करून ते करिअर निवडल्यामुळे तुम्हाला कायम निराशेशी भावना टोचत राहते. अशा करिअरमध्ये अडचणी निर्माण झाल्यास पैसे वाया गेल्याने अपराधीपनाची भावना तुम्हाला बोचत राहते.

नादुरुस्त कार किंवा जुने गॅझेट याचे उदाहरण पण समजावून घ्या. तुमच्याकडे एक जुनी कार आहे जिचा मेंटेनन्स खूप वाढला आहे. गेल्या महिन्यात तुम्ही त्यावर ५०,००० रुपये खर्च केले, पण तरीही ती पुन्हा बिघडली. आता मेकॅनिक सांगतोय की पुन्हा ३०,००० खर्च येतील.

अशा वेळी आपण विचार करतो, "गेल्या महिन्यात ५०,००० घातलेच आहेत, आता ती भंगारात काढली तर ते पैसे वाया जातील." हा विचार करून तुम्ही पुन्हा ३०,००० खर्च करता. प्रत्यक्षात, ती कार विकून नवीन घेणे किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे अधिक फायदेशीर असते, पण सन कॉस्टमुळे तुम्ही त्यात पैसे टाकत राहता आणि हे चक्र सतत सुरू राहते. तुम्ही गाडीचा पूर्ण उपभोग पण घेऊ शकत नाही पण पैसे मात्र घालवत आहात.

हॉटेलमधील जेवण तुम्ही एका 'अनलिमिटेड थाळी' किंवा 'बफे' (Buffet) साठी ८०० रुपये मोजले आहेत. तुमचे पोट अर्ध्या जेवणातच भरले आहे, पण तरीही तुम्ही विचार करता, "मी ८०० रुपये दिले आहेत, पैसे वसूल झाले पाहिजेत." या विचाराने तुम्ही भूक नसतानाही जास्त जेवता. येथे ८०० रुपये ही सन कॉस्ट आहे. तुम्ही जास्त जेवलात तरी ते पैसे परत मिळणार नाहीत, उलट अतिजेवणामुळे तुमची तब्येत बिघडू शकते. म्हणजेच पैसे वाचवण्याच्या नादात तुम्ही आरोग्याचे नुकसान करून घेता. दिलेले पैसे वसुल झालेच पाहिजेत या नादात आपण शारीरिक त्रास वाढवून घेतोय हे समजणें गरजेचे आहे.

जिमचे सबस्क्रिप्शन ऐक उत्तम उदाहरणं म्हणून पाहता येईल.

अनेकांसोबत असे घडते की, ते वर्षाचे जिमचे पैसे एकदम भरतात. दोन महिन्यांनंतर त्यांना व्यायामाचा कंटाळा येतो किंवा काही कारणास्तव ते जमणार नसते. पण "पैसे भरले आहेत म्हणून गेलेच पाहिजे" या दडपणाखाली ते अनिच्छेने जिममध्ये जातात किंवा केवळ त्या पैशांचा विचार करून स्वतःला दोष देत राहतात. यामुळे मानसिक ताण वाढतो. चुकीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक (Stock Market) तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर ५०० रुपयांना विकत घेतला आणि आता त्याची किंमत १०० रुपयांवर आली आहे. कंपनीची परिस्थिती सुधारण्याची कोणतीही चिन्हं नाहीत. तरीही तुम्ही तो शेअर विकत नाही, कारण तुम्हाला वाटते की "मी ५०० रुपयांना घेतला होता, आता विकला तर ४०० रुपयांचे नुकसान होईल."

हे नुकसान आधीच झालेले असते. तो शेअर १०० रुपयांना विकून उरलेले पैसे दुसऱ्या चांगल्या कंपनीत गुंतवणे फायदेशीर ठरले असते, पण संक कॉस्टच्या मोहजालामुळे गुंतवणूकदार तो शेअर धरून ठेवतात आणि अधिक नुकसान सोसतात.

थोडक्यात सांगायचे तर, जेव्हा तुम्ही स्वतःला असा विचार करताना पाहाल की, "मी आधीच इतके केले आहे, म्हणून आता थांबता येणार नाही," तेव्हा सावध व्हा. तो तुमचा तर्कदोष (Fallacy) असू शकतो. आपल्याला दैनंदिन आयुष्यात अनेक असे अनुभव येतात.

Comments
Add Comment