Tuesday, January 20, 2026

Pune Cycle Tour : पुण्यात आंतरराष्ट्रीय सायकल टूरला अपघाताचे गालबोट; ५० हून अधिक सायकलस्वार एकमेकांवर धडकले अन्...

Pune Cycle Tour : पुण्यात आंतरराष्ट्रीय सायकल टूरला अपघाताचे गालबोट; ५० हून अधिक सायकलस्वार एकमेकांवर धडकले अन्...

पुणे : जागतिक स्तरावर पुण्याचे नाव उंचावणाऱ्या 'बजाज पुणे ग्रँड सायकल टूर' या भव्य स्पर्धेला मंगळवारी एका भीषण अपघाताने गालबोट लागले. स्पर्धेचा दुसरा दिवस असतानाच, एका सायकलस्वाराचा ताबा सुटल्याने पाठोपाठ येणारे सुमारे ५० हून अधिक खेळाडू एकमेकांवर जोरात आदळले. या विचित्र अपघातात अनेक सायकलस्वार गंभीर जखमी झाले असून सायकलींचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

नेमकी घटना काय ?

पुणे जिल्हा सायकलिंग असोसिएशन आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरू झाली होती. मंगळवारी सकाळी खेळाडूंचा वेग प्रचंड असताना एका वळणावर आघाडीवर असलेल्या सायकलस्वाराचा ताबा सुटला. वेग जास्त असल्याने मागून येणाऱ्या खेळाडूंना वेळीच ब्रेक लावता आला नाही. परिणामी, साखळी प्रक्रियेप्रमाणे (Chain Reaction) एकावर एक ५० हून अधिक सायकलींचा खच पडला. काही क्षणातच आनंदाचे रूपांतर ओरडाओरडीत झाले. या भीषण अपघातात खेळाडूंना हात, पाय आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झाली आहे. मात्र, सुदैवाने सर्व खेळाडूंनी हेल्मेट घातलेले असल्यामुळे डोक्याला होणारी मोठी इजा टळली आणि मोठी जीवितहानी टळली. सायकलींचे महागडे पार्टस आणि सांगाडे या धडकेत पूर्णपणे तुटले आहेत. यामुळे अनेक गुणवान खेळाडूंना या स्पर्धेतून अर्ध्यातूनच बाहेर पडावे लागले आहे. अपघात घडताच घटनास्थळी तैनात असलेल्या रुग्णवाहिका आणि डॉक्टरांच्या पथकाने तातडीने धाव घेतली. जखमी खेळाडूंना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर काही काळ स्पर्धेच्या मार्गावर तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेत सुरक्षेची काळजी घेतली गेली होती, मात्र खेळाचा वेग आणि तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडला. जखमी खेळाडूंना सर्वतोपरी मदत केली जात असून, उर्वरित स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. तरीही या घटनेमुळे सायकलिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

आयोजकांचा निष्काळजीपणा नडला?

'बजाज पुणे ग्रँड सायकल टूर'मध्ये ५० हून अधिक सायकलस्वार एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातानंतर आता आयोजकांच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेत सुरक्षेचे सर्व जागतिक नियम पाळले जात असल्याचा दावा आयोजकांनी केला होता. मात्र, प्रत्यक्ष स्पर्धेदरम्यान तिकोना किल्ल्याजवळील रस्ता अत्यंत अरुंद असल्याचे समोर आले आहे. वेगवान सायकलिंगसाठी अशा अरुंद मार्गाची निवड करणे हा आयोजकांचा चुकीचा निर्णय होता का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक खेळाडूंनी या दुर्घटनेनंतर आयोजकांविरुद्ध आपला रोष व्यक्त केला आहे.

जागतिक सायकलिंग फेडरेशनच्या देखरेखीखाली आयोजन

ही केवळ एक साधी सायकल शर्यत नसून, खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारी ४३७ किलोमीटर लांबीची एक मोठी मोहीम आहे. पुणे जिल्ह्यातील विविध भौगोलिक भागांतून जाणारा हा मार्ग आंतरराष्ट्रीय सायकलस्वारांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. या स्पर्धेमुळे पुण्याचे नाव आता पॅरिस आणि लंडनसारख्या जागतिक सायकलिंग शहरांच्या यादीत मानाने घेतले जात आहे. इतक्या मोठ्या स्तरावरील 'मल्टी स्टेज' शर्यत पार पाडण्यासाठी पुणे शहर आणि जिल्हा प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून मोठी तयारी केली आहे. शर्यतीच्या मार्गावर विशेष बदल करण्यात आले असून, खालील बाबींवर भर देण्यात आला आहे: सायकलचा प्रचंड वेग लक्षात घेता मार्गावरील खड्डे आणि अडथळे दूर करण्यात आले आहेत. ४३७ किलोमीटरच्या या पट्ट्यात शर्यतीदरम्यान वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. 'UCI' च्या नियमांनुसार वळणांवर आणि चढ-उतारांवर आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनलने भारतात ही २.२ दर्जाची शर्यत आयोजित करण्यास मंजुरी देणे, हा भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी मोठा विजय मानला जात आहे. या स्पर्धेमुळे केवळ पुणेच नव्हे, तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा