Tuesday, January 20, 2026

सिनेमातील ‘सायकलचोर’

सिनेमातील ‘सायकलचोर’

आशय वीणा सानेकर

चित्रपटाची एक भाषा असते.ते दृश्य माध्यम असल्याने कॅमेरा तिथे खूप काही बोलत असतो हे तर खरेच. पण साहित्याची अभ्यासक म्हणून मला नेहमी हे जाणवत आले की साहित्यविश्वातील विविध साहित्यकृती आणि चित्रपट यांचा जवळचा संबंध आहे. एखाद्या कथेवर किंवा कादंबरीवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला की मूळ कथा किंवा कादंबरीदेखील रसिकांपर्यंत अधिक पोहोचते. एखादी कविता गाणे होऊन चित्रपटात सामावून गेली की ती अधिक सुंदर होऊन येते. विविध ध्वनी व अर्थयुक्त भाषा आणि चित्रपट यांच्यातले पैलू तपासणे हेही अत्यंत आनंददायी आहे. अशीच मनमोकळी चर्चा आमच्या सोमैया विद्याविहार विद्यापीठात एकदा रंगली. तरुण प्राध्यापक समीर राणे, नारायण परशुराम सर आणि मी यांच्या मुक्त चर्चेतून चित्रपटविषयक कार्यशाळेची कल्पना साकारली.

या कार्यशाळेत ‘बायसिकल थिव्ज’ नावाचा नववास्तववादी इटालियन चित्रपट अनुभवला. व्हिटोरिओ डी सिका या दिग्दर्शकाने त्याचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाचे रीतसर प्रशिक्षण न घेतलेले कलावंत हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य. ब्रूनो नावाचा चमकदार डोळ्यांचा एक मुलगा हे या चित्रपटातले एक महत्त्वाचे पात्र आहे. आपल्या वडिलांना फुलांची विक्री करण्यासाठी मदत करत असताना चित्रपटाचे शूटींग पाहतो आणि या चित्रपटात त्याला महत्त्वाची भूमिका मिळते.

बायसिकल थिव्हज हा चित्रपट १९४८ साली प्रदर्शित झाला. नवरा, बायको आणि दोन मुले यांचे हे कुटुंब. तसे आर्थिकदृष्ट्या खालच्या वर्गातले. नायकाला अॅन्टोनिओला भिंतीवर पोस्टर्स लावायची नोकरी मिळते. या कामाकरता त्याला फिरावे लागणार असते आणि त्यासाठी त्याला सायकलीची गरज असते. बायकोला म्हणजे मारियाला लग्नात मिळालेली मौल्यवान पांघरुणे विकून हे कुटुंब सायकल विकत घेते. सायकलचे घरात येणे संबंध कुटुंबासाठी आनंद दायी ठरते. मुलाचा म्हणजे ब्रूनोचा तर त्या सायकलीवर विलक्षण जीव जडतो. पहिल्याच दिवशी ती चोरीला जाते. नायक पोलिसात जाऊन तक्रार करतो पण तेही त्याला काही शब्द देत नाहीत. न्याय किंवा पोलिसी यंत्रणेसारखी संस्था खरे तर व्यक्तीचा आधार बनली पाहिजे पण तसे होत नाही. संबंध चित्रपटभर अख्खे कुटुंब सायकलीचा शोध घेते. हा शोध प्रेक्षकाला खिळवून ठेवतो. चोरबाजारासारख्या ठिकाणी ब्रूनो आणि त्याचे वडील सायकलीचा जो शोध घेतात, तो आपण डोळ्यांची पापणी न हलवता पहात राहतो. नायकाला सायकलचोर दिसतो, तो एका म्हाताऱ्या सोबत! चोर पळून जातो आणि तो म्हातारा धावत एका चर्चमध्ये शिरतो. पाठोपाठ नायक ब्रूनोसोबत चर्चमध्ये शिरतो. अन्न फुकट मिळणार म्हणून म्हातारा तिथे असतो . एकीकडे चर्च मधली प्रार्थना आणि दुसरीकडे परिस्थितीतून आलेली अगतिकता यातला विरोधाभास एक वेगळेच परिमाण देऊन जातो.

अॅन्टोनिओला परत एका गरीब वस्तीत चोर दिसतो पण तिथे आसपासचे वस्तीतले रहिवासी जणू नायकावर हल्लाच चढवतात. संशयित सायकलचोर नायका पेक्षा अधिक गरीब परिस्थितीत जगतो आहे. वस्तीवाले नायकाला धमकी देतात. तिथून तो बाहेर पडतो आणि अशा ठिकाणी येतो जिथे त्याला बराच काळ कार्यालया बाहेर उभी केलेली सायकल दिसते. ती एकटी सायकल त्याला खुणावते. तिला पळवण्याचा विचार मनात येतो आणि नायक मुलाला ट्रॅममधून घराच्या दिशेने जायला सांगतो आणि क्षणात चपळाईने ती सायकल पळवतो. जोरदार गलका होतो. ब्रूनो हे पाहून टूममधून उतरतो. गर्दी त्याच्या बापाला, नायकाला घेरते. सायकलीच्या शोधासाठी व्याकुळ त्याचा बाप शेवटी सायकलचोर ठरतो. घाबरलेल्या

रडवेल्या त्या लहान मुलाला पाहून मालक नायकाला सोडून देतो.

भांडवलशाही समाज, सामाजिक न्यायासाठी

तडफडणारे गोरगरीब, जागतिक महायुद्धाने निर्माण केलेली प्रतिकूल परिस्थिती, गरिबी आणि बेकारी यांचे वास्तव या चित्रपटातून उभे राहते आणि आपण या चक्रव्यूहात गरगरत राहतो. आपल्याला आठवतो आपल्याकडचा शंभू मित्रांचा जागते रहो हा चित्रपट पण त्याच्या विषयी पुन्हा कधीतरी असेच बोलू आशय शोधताना !

Comments
Add Comment