Tuesday, January 20, 2026

मुंबई महापालिकेत महिला नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत!

मुंबई महापालिकेत महिला नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत!

२२७ प्रभागांमध्ये १३० नगरसेविका विजयी

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण असले तरी महापालिकेत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक महिला नगरसेवक निवडून येण्याची परंपरा यंदाही कायम आहे. यंदा मुंबई महापालिकेवर १३० नगरसेविका निवडून आल्या आहेत. २२७ प्रभागांपैकी ११४ प्रभाग महिलांसाठी राखीव असताना यंदा १३० महिला निवडून आल्या आहेत.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यंदाही मोठ्या संख्येने महिला निवडून आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी नियमानुसार ११४ प्रभाग हे महिलांसाठी राखीव होते. या निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांनी खुल्या प्रभागातही महिला उमेदवार दिले होते. त्यामुळे निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. २०१२ पासून महापालिकेवर निवडून येणाऱ्या महिलांची संख्या ११४ पेक्षा अधिक असते. तीच परंपरा यंदाही राखली आहे.

मुंबई महापालिकेत यंदा निवडून आलेल्या नगरसेविकांमध्ये सर्वाधिक नगरसेविका या भाजपच्या आहेत. त्याखालोखाल उबाठा गट, शिवसेना यांचे उमेदवार आहेत. भाजपच्या ४९ नगरसेविका निवडून आल्या आहेत. तर उबाठा गटाच्या ३८ नगरसेविका निवडून आल्या आहेत. शिवसेना पक्षाच्या १९ व काँग्रेसच्या ११ आणि मनसेच्या पाच नगरसेविका निवडून आल्या आहेत. एमआयएमच्याही पाच नगरसेविका निवडून आल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या विविध समित्या व विशेष समित्यांमध्येही महिलांना त्याच प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळणार आहे. या महिलांमध्ये मुस्लिम समाजाच्या महिलांचेही प्रमाण लक्षणीय आहे. मुंबई महापालिकेत यंदा १३० महिला नगरसेवक निवडून आल्या आहेत, तर २०१७ मध्ये १३३ महिला आणि २०१२ मध्ये १२१ महिला निवडून आल्या आहेत. त्यापूर्वी महिला नगरसेवकांची संख्या ८९ इतकी होती. मात्र गेल्या काही वर्षात महिलांनी राजकारणात आपले अस्तित्व निर्माण केले असून अनारक्षित जागांवरही महिला निवडून येऊ लागल्या आहेत.

मुंबई महापालिकेत गेली तीस वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाची महिला आघाडी असून या महिला आघाडीतील अनेक महिला गेल्या पंचवीस वर्षात नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

कोणाचे किती महिला नगरसेवक?

भाजपचे ८९ नगरसेवकांमध्ये ४९ महिला नगरसेवक, शिवसेना उबाठा गटाचे ६५ नगरसेवकांमध्ये ३८ महिला नगरसेवक, शिवसेनाचे २९ नगरसेवकांमध्ये १९ महिला नगरसेवक, काँग्रेसचे २४ नगरसेवकांमध्ये ११ महिला नगरसेवक, एमआयएम ८ नगरसेवकांमध्ये ५ महिला नगरसेवक, मनसेच्या ६ नगरसेवकांमध्ये ५ महिला नगरसेवकांचा समावेश आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा