पनवेलच्या सर्वांगीण विकासाचा दिला मंत्र
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप-महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविकांशी रविवारी सदिच्छा भेट घेऊन संवाद साधला. कामोठे येथील आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत त्यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांना उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली भाजपने पनवेल पालिकेत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण ७८ जागांपैकी भाजपचे ५५ आणि महायुतीचे एकूण ५९ नगरसेवक निवडून आले आहेत. या यशात परेश ठाकूर यांचे नियोजन आणि प्रचार यंत्रणेतील सक्रिय सहभाग मोलाचा ठरला आहे.
कार्यकर्त्यांचा प्रचंड आग्रह असतानाही परेश ठाकूर यांनी यंदा निवडणूक न लढवण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. मात्र, त्यांनी पूर्ण वेळ प्रचारात झोकून दिले. रॅली, पदयात्रा आणि घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधल्याने भाजप महायुतीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
यावेळी परेश ठाकूर यांनी अनुभवी नगरसेवकांसह निवडून आलेल्या तरुण आणि नवीन चेहऱ्यांशी चर्चा केली. "जनतेने विकासावर विश्वास ठेवून आपल्याला कौल दिला आहे, आता त्याच विश्वासाला पात्र ठरून कामाला लागा," असा सकारात्मक संदेश त्यांनी यावेळी दिला.






