Monday, January 19, 2026

पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छीमाराचा मृत्यू

पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छीमाराचा मृत्यू

शिक्षा पूर्ण होऊनही कैदेत ठेवण्याचा अमानवी प्रकार

पालघर : शिक्षेचा कालावधी संपून तब्बल साडेतीन वर्षे उलटूनही मुक्तता न मिळाल्याने पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या एका भारतीय मच्छीमाराचा शुक्रवारी मृत्यू झाला. राष्ट्रीयत्व सिद्ध झाल्यानंतरही त्याला सोडण्यात आले नाही. या घटनेमुळे सीमारेषा चुकून ओलांडलेल्या निष्पाप मच्छीमारांचे प्राण किती काळ असेच जाणार, असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे. केंद्र सरकार यावर ठोस पावले उचलणार का, असा प्रश्न मच्छीमार कुटुंबांमधून व्यक्त होत आहे.

शुक्रवारी पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या एका भारतीय मच्छीमाराचा मृत्यू झाला. त्याची शिक्षा जवळपास साडेतीन वर्षांपूर्वीच पूर्ण झाली होती आणि त्याचे भारतीय नागरिकत्वही सिद्ध झाले होते. अशा परिस्थितीत त्याला केव्हाच मुक्त करणे अपेक्षित होते. मात्र, शिक्षा पूर्ण होऊनही त्याला पाकिस्तानने तुरुंगातच ठेवले आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. “पाकिस्तानच्या तुरुंगात काही भारतीय मच्छीमार आजारी असल्याची माहिती मिळत आहे,” असे शांततावादी कार्यकर्ते जतीन देसाई यांनी सांगितले.

गुजरातच्या किनारपट्टीवर मासेमारी करताना अनेकदा बोटी चुकून पाकिस्तानच्या सागरी हद्दीत जातात. त्यावेळी पाकिस्तानची मेरीटाईम सिक्युरिटी एजन्सी मच्छीमारांना अटक करते आणि त्यांना कराचीतील तुरुंगात पाठवले जाते. सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात महाराष्ट्रातील १९ जणांसह भारतातील एकूण १९९ मच्छीमार कैदेत आहेत. त्यापैकी अनेकांची शिक्षा तीन वर्षांपूर्वीच पूर्ण झाली आहे. तरीही त्यांची मुक्तता झालेली नाही. त्यामुळे या मच्छीमारांना मानसिक छळ सहन करावा लागत आहे.

घरातील कमावता सदस्य कैदेत असल्याने कुटुंबांचा उदरनिर्वाह ठप्प झाला आहे. कर्ता पुरुष नसल्याने अनेक कुटुंबे नैराश्यात जगत आहेत. शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही कैदेत असलेल्या मच्छीमारांच्या सुटकेसाठी महिनाभरापूर्वी काही कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली होती आणि आपल्या आप्तांना मायदेशी परत आणण्याची विनंती केली होती. मात्र अद्याप परराष्ट्र विभागाकडून ठोस हालचाल दिसून आलेली नाही. भारत सरकारने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या भारतीय मच्छीमारांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जतीन देसाई यांनी केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा