Sunday, January 18, 2026

अलिबागमध्ये महिला मतदारांचे वर्चस्व

अलिबागमध्ये महिला मतदारांचे वर्चस्व

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

अलिबाग : तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सात गट आणि अलिबाग पंचायत समितीच्या १४ गणासाठी तालुका निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीत दोन लाख एक हजार ९२३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.

अलिबाग तालुक्यातील दोन लाख एक हजार ९२३ एकुण मतदारांपैकी १ लाख ०३ हजार ११७ महिला मतदार, तर पुरुष मतदारांची संख्या ९८ हजार ८०६ इतकी आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. अलिबाग तालुक्यात २६१ मतदान केंद्र असणार आहेत, त्यात एक महिलांसाठी मतदान केंद्र असेल. मतदानासाठी २८७ मतदान कंट्रोल यूनिट व ५७४ बॅलेट यूनिट अधिग्रहीत करण्यात आली आहेत.

अलिबाग तालुक्यात समान नावांची नोंद असलेले ९ हजार ९९७ संभाव्य दुबार मतदार आढळले आहेत, तर छायाचित्र समान असलेल्या मतदारांची पडताळणी केली असता, या ९ हजार ९९७ मतदारांपैकी २ हजार २८२ मतदार दुबार आढळून आले आहेत. आयोगाकडील सूचनांनुसार या मतदारांकडून जोडपत्र १ भरून घेण्यात आलेले आहे. त्यांनी कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार हे लिहून दिलेले आहे. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे त्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे आवश्यकती काळजी घेतली जाणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांग, तसेच ज्येष्ठ नागरीक मतदारांसाठी स्वतंत्र रांग असणार आहे. अशा मतदारांना प्राधान्याने मतदानाची संधी दिली जाईल तसे त्यांना व्हीलचेअर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पंचायत समिती गणनिहाय आरक्षण

वैजाळी, शहापूर, आंबेपूर, आक्षी, काविर (सर्वसाधारण).

किहीम, चेंढरे, चौल, रामराज (सर्वसाधारण स्त्री).

रेवदंडा (नागरिकांचा मागास प्रवर्ग)

आवास, वरसोली (नागरिकांचा मागास प्रवर्ग-स्त्री).

रूईशेत भोमोली (अनुसूचित जमाती).

थळ (अनुसूचित जमाती-स्त्री).

Comments
Add Comment