Sunday, January 18, 2026

“आम्ही म्हणू ते धोरण, सांगू ते तोरण हे खपवून घेणार नाही!”

“आम्ही म्हणू ते धोरण, सांगू ते तोरण हे खपवून घेणार नाही!”

आमदार संजय केळकरांचा शिवसेनेला इशारा

ठाणे : “आम्ही सांगू तेच धोरण आणि आम्ही म्हणू ते तोरण खपवून घेणार नाही. वेळ पडल्यास विरोधी बाकांवरही बसण्याची तयारी आहे असा इशारा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेला (शिंदे गट) दिला आहे. गेल्या ४० वर्षामध्ये असे यश भाजपला मिळाले नव्हते, इतका मतटक्का वाढला आहे, त्यामुळे भविष्यात भाजप मोठी भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त करीत, आम्ही एकत्र लढलोय त्यामुळे एकत्रच राहू, तरी अंकुश ठेवणारी एक शक्ती लागते, तेव्हा वेळ पडली तर आम्ही वेगळा विचार करू असा सूचक इशारा भाजप आमदार संजय केळकर यांनी दिला. ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादीत केल्यानंतर आज (१७ जाने.) वर्तकनगर येथील भाजप विभागीय कार्यालयात सर्व विजयी नगरसेवकांसमवेत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

महापालिका निवडणुकीच्या निकालात ठाणे महापालिकेत भाजप आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) महायुतीला लोकांनी कौल दिला आहे. येथे भाजपला २८ आणि शिंदे गटाला ७५ जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी ठाण्यात भाजपा आणि शिंदे गट यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. ऐन निवडणुकीपूर्वी या दोन्ही पक्षांनी युती करून निवडणूक लढवली. आता निकालानंतर पुन्हा एकदा भाजप आणि शिंदेसेनेतील वाद समोर येत आहे. जनतेच्या मताचा, कार्यकर्त्यांच्या भावना आणि लोकशाही मूल्यांचा आदर न करता निर्णय लादले जात असतील, तर ते स्वीकारले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

धोरण ठरवताना चर्चा, पारदर्शकता आणि लोकसहभाग आवश्यक असतो. मात्र सध्या निर्णय वरून लादले जात असून, विरोधी मतांना डावलले जात असल्याचा आरोप करण्यात आला. “जनतेसाठी काम करणाऱ्यांना गृहीत धरून, केवळ सत्ता टिकवण्यासाठी घेतलेले निर्णय शेवटी जनतेच्याच विरोधात जातात,” असेही वक्त्यांनी नमूद केले. कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी सांगितले की, जमिनीवर राबणाऱ्यांचे मत न ऐकता, केवळ बंद खोलीतील धोरणे रेटली गेली, तर त्याला तीव्र विरोध केला जाईल. “लोकशाहीत दबावाचे राजकारण नाही, तर संवादाचे राजकारण अपेक्षित आहे,” असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला. या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, आगामी काळात या भूमिकेचा सत्ताधाऱ्यांच्या निर्णयप्रक्रियेवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शीळ ते वडवली भाजप वाढवली - संदीप लेले

यावेळी सर्व विजयी नगरसेवक, भाजपच्या प्रदेश महामंत्री माधवी नाईक, निवडणुक प्रभारी आ. निरंजन डावखरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष लेले यांनी, चप्पा चप्पा भाजपा...चांद्यापासुन बांद्यापर्यंत हे ओवळा एक नंबर ते शीळ असे दुसऱ्या टोकापर्यंत भाजपने ठाण्यात साध्य करून दाखवल्याचे म्हटले आहे. ठाण्यात भाजपचे १२ उमेदवार प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात होते तर उर्वरीत १६ रिपिटेड होते. कोपरी - पाचपाखाडीत विधानसभा क्षेत्रात चार, ठाणे शहर विधानसभेत १८ होते २१ केले.ओवळा - माजिवड्यात एकच होता आता ४ झाले. कळवा - मुंब्रा विधानसभा क्षेत्रात शुन्य होते तिथे आता शिळ प्रभाग २९ मध्ये भाजपचा एक निवडून आला आहे.माझी जिल्हाध्यक्ष पदाची ही तिसरी टर्म आहे, पहिल्यावेळी ४ नंतर ८ झाले, २०१७ मध्ये आठचे २३ झाले आणि आता २८ झाले. अशा प्रकारे शीळ ते वडवली...भाजपा वाढवली असे लेले म्हणाले.

Comments
Add Comment