गोवा : गोव्यामध्ये दोन रशियन महिलांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. सुरुवातीला पोलिसांना रशियन महिला एलेना कस्थानोवाचा मृतदेह सापडला होता. या महिलेचे हात-पाय बांधलेले होते आणि तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. या प्रकरणी पोलिसांनी रशियन महिलेच्या लिव्ह-इन पार्टनर अलेक्सी लिओनोव्हला अटक केली. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली तेव्हा त्याने फक्त एलेनाची हत्या केली नाही तर आणखी एका रशियन महिलेची हत्या केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलेक्सी लिओनोव्ह असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा रशियाचा आहे आणि तो बऱ्याच काळापासून गोव्यात राहत होता. लिओनोव्हने एलेना कस्थानोवा आणि एलिना वानीवा या दोन महिलांची हत्या केली. दोन्ही महिलांची हत्या एकाच पद्धतीने करण्यात आली होती. दोघींचे हात-पाय बांधून त्यांची चाकूने वार करत हत्या करण्यात आली होती. आरोपीने सुरूवातीला त्याची लिव्ह इन पार्टनर एलेनावर हल्ला केला. त्यानंतर त्याने तिचे हात-पाय बांधले आणि तिच्यावर चाकूने अनेक वेळा वार केले. आरोपी ऐवढ्यावर थांबला नाही. नंतर त्याने ऐलेनाचा गळा चाकूने चिरला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी अलेक्सी लिओनोव्ह याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.






