Sunday, January 18, 2026

गाईमुळे वाघाचा उद्धार

गाईमुळे वाघाचा उद्धार

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे

पद्मपुराणातील एका कथेनुसार प्राचीन काळी एक प्रभंजन नावाचा धर्मपरायण राजा राज्य करीत होता. तो एकदा शिकारीला गेला असता त्याने एका झाडीमध्ये एक हरिण पाहिले. त्याने त्याचा वेध घेऊन बाण चालवला. हरिण घायाळ झाले. हरिणाने उठून आजूबाजूला पाहताच त्याला धनुष्यबाण घेतलेला राजा दिसला. त्याला पाहताच तो म्हणाला ‘हे राजन! मी माझ्या पाडसाला दूध पाजीत होते. असे असताना त्याच वेळेस तू मला मारले. हे कृत्य योग्य नाही, त्यामुळे मी तुला शाप देते की, तू या वनात राक्षस होऊन मांस भक्षण करशील’.

हरिपाठणीची ही शापवाणी ऐकून राजा दुःखी झाला. तो म्हणाला ‘तू आपल्या पाडसाला पाजीत आहेस याची मला जाणीव नव्हती. माझ्याकडून चूक झाली. मी तुझ्या शापाचा स्वीकार करतो; परंतु यातून मला कधी मुक्ती मिळेल’. तेव्हा हरिणी म्हणाली, पुढे कालांतराने तुला भेटलेल्या नंदा नामक गाईमुळे तू शापमुक्त होऊन परत मनुष्य होशील, असा उ:शाप दिला. हळूहळू त्या जंगलात गवत व पाण्याचे साठे निर्माण झाले. त्यामुळे गाई चारणाऱ्या गवळी लोकांनी रानाच्या बाजूला नदीच्या काठी मुकाम केला.

एके दिवशी एक गाय चरत चरत दूर गेली व प्रत्यक्ष वाघाच्या समोरच उभी राहिली. आयती चालत आलेली ही शिकार पाहून वाघाला आनंद झाला, तर वाघाला पाहून गाय गर्भगळीत होऊन, परत जाण्यासाठी प्रयत्न करू लागली, तोच वाघाने तिला म्हटले, ‘थांब! आज नियतीनेच तू भक्ष्य म्हणून माझ्या समोर उभी झाली आहेस. तेव्हा आता कुठे जातेस? मी तुला खाणार आहे. तेव्हा गाय घाबरली व वाघाची गयावया करून त्याला विनवू लागली. माझे पोर लहान आहे. अद्याप त्याला गवतही खाता येत नाही. तू आता मला खाल्लेस तर माझे पोर

दुधाविना राहील. तेव्हा मी त्याला पाजून येते व नंतर तू मला भक्षण कर. गाईचे हे कळकळीचे बोलणे ऐकून वाघ म्हणाला, ‘तू आपण होऊन माझ्या समोर आली आहेस आणि आता परत जाण्याची विनवणी करत आहेस, पण मला सांग मृत्यूच्या दारातून परत आल्यानंतर मरण्यासाठी पुन्हा कोणी येतो का? त्यावर गाय म्हणाली, ‘मला प्रिय असणाऱ्या सर्व व्यक्तींची शपथ घेऊन मी सांगते, मी परत येईन. मला एकदा माझ्या बाळाला दूध पाजू दे. त्याला कल्याण अकल्याणाच्या चार गोष्टी सांगून व त्याला माझ्या सख्यांच्या स्वाधीन करून मी नक्की परत येईन. मी माझा शब्द न पाळल्यास मला मातृ-पितृ हत्या करणाऱ्याला जे पाप लागते ते पाप मला लागेल. एखादी उत्तम कथा ऐकत असताना जो मध्ये विघ्न आणतो त्याला जे पाप लागते ते मला लागेल. वचन न पाळणाऱ्याला जे पाप लागते ते मला लागेल. कृपया म्हणून मला जाऊ द्या, मी परत येईन.

वाघाने तिची विनवणी ऐकून तिला जाण्याची परवानगी दिली. गाय धावतच आपल्या वासराकडे आली. ती अत्यंत घाबरलेली होती. वासराने तिला पाहून तू एवढी घाबरली का आहेस? तुला वेळ का झाला? अशी विचारणा केली असता दुःखी अंतकरणाने तिने सर्व कथा कथन केली व आज पोटभर दूध पिऊन घे, उद्या तुला दूध मिळणार नाही. मला पुन्हा वाघाकडे जावे लागेल, असे म्हटले. तेव्हा पाडस म्हणाले, जी मुले केवळ आईच्या दुधावरच जिवंत आहेत त्यांना )आईशिवाय दुसरा कोणता आधार मिळणार? मुलांना आईशिवाय आधार नाही. तेव्हा मी सुद्धा तुझ्यासोबत येईन. तुझ्या वाचून मी कसा राहू. माझ्यासह तुला वाघाने खाल्ल्यास मातृभक्ताला जी गती मिळते ती तरी मला प्राप्त होईल, असे म्हणून वासरूही गाईसोबत वाघाकडे निघाले.

वाघाकडे गेल्यावर गाईने वाघास म्हटले, ‘मी तुला दिलेल्या वचनाप्रमाणे आली आहे. आता तू माझे भक्षण करून तृप्त हो’. सत्य वचनाप्रमाणे वागणाऱ्या गाईला पाहून वाघ म्हणाला, तुझ्या सत्य वागण्याचे मला कौतुक आहे. म्हणून मी तुला मुक्त करीत आहे. जग सत्यावरच अधिष्ठीत आहे, हे तू दाखवून दिले आहेस. धर्म सुद्धा सत्यावरच आधारित आहे.

माझ्याकडून आजपर्यंत अनेक पापे घडली आहेत. आता पापमुक्तीसाठी मी काय करावे असे वाघाने गाईला विचारले. गाय म्हणाली, कृतयुगात तपाने, त्रेतायुगात ज्ञानाने व द्वापार युगात यज्ञाने जे फळ मिळते ते कलियुगात दानाने प्राप्त होते व सर्व दानात श्रेष्ठ दान म्हणजे अभयदान, जे तू आता मला दिले आहेस. जो अभय देतो तो परब्रह्म पद प्राप्त करतो, असा उपदेश केला. वाघाने गाईला तिचे नाव विचारतात तिने नंदा म्हणून सांगितले. हे ऐकताच राजा शापमुक्त झाला व पूर्ववत मनुष्य रूपात आला.

गाईच्या धर्मपरायण वृत्तीमुळे प्रत्यक्ष धर्म त्या ठिकाणी प्रकट झाला व गाईला म्हणाला, तुझ्या धर्मपरायण वृत्तीमुळे मी प्रसन्न झालो आहे. तू इच्छित वर माग. तेव्हा गाय म्हणाली, हे स्थान ऋषीमुनींसाठी पवित्र स्थान व्हावे व ही सरस्वती नदी नंदा सरस्वती म्हणून ओळखली जावी, असा वर मागितला. धर्माने तथास्तु म्हणताच गाय वासरासह सत्यलोकी गेली. राजाही त्याच्या मृत्यूनंतर स्वर्गलोकी गेला.

Comments
Add Comment