कथा,रमेश तांबे
एकदा एक शेठजी एका जंगलात फिरायला गेले होते. जंगल अतिशय घनदाट होते. फिरता फिरता त्यांना एका झाडावर दोन दुर्मीळ पक्षी बसलेले दिसले. मध्यम आकाराचे रंगीबेरंगी पक्षी पाहून त्याला फार आनंद झाला. अन् त्याच्या मनात विचार आला की, असे पक्षी आपल्या बागेत असतील तर काय मजा येईल ना! पण त्या पक्ष्यांना पकडायचं कसं? हा प्रश्न त्याच्यापुढे होता. त्यामुळे त्यांनी त्या जंगलातच राहणाऱ्या एका माणसाला विचारलं, “अरे बाबा हे दोन पक्षी मला तू पकडून देशील का? मी तुला पैसे देईन!”, “माझ्यासाठी अगदी सोपं काम आहे” असे म्हणत त्याने त्या दोन पक्ष्यांना शेठजींच्या हवाली केले. मग शेठजींनी त्याला काही पैसे दिले. तो माणूस खूप खूश झाला आणि निघून गेला. मग शेठजी दोन्ही पक्षी घेऊन आपल्या बागेत आले आणि माळ्याला म्हणाले, “हे दोन पक्षी मी तुला देतो आहे, या पक्ष्यांना तू चांगलं शिकवं, त्यांच्यावर लक्ष ठेव” असं म्हणून शेठजी निघून गेले. एका महिन्यानंतर त्यांना आठवण झाली, की आपण ते दोन पक्षी आणले होते, चला बघू या त्यांची काय प्रगती झाली आहे.
मग एके दिवशी शेठजींनी बागेत येऊन माळ्याला विचारलं, “अरे, तुला ते दोन पक्षी दिले होते त्यांना चांगलं तयार केलंस की नाही?” माळी म्हणाला, “होय शेठजी, त्यातला एक पक्षी बघा कसा उडतो आहे, आकाशात छान भराऱ्या घेतोय! पण दुसरा पक्षी मात्र एकाच जागेवर बसलेला असतो. तो पाहा रोज त्याच फांदीवर बसलेला असतो. त्यानंही आकाशात उडावं, हवेत मस्त गिरक्या घ्याव्यात यासाठी मी किती तरी प्रयत्न केले. पण तो काही उडायला तयार नाही.” शेठजी म्हणाले, “अरे मग मला अगोदर सांगायचं नाहीस का? एवढे दिवस वाट का पाहिलीस. ठीक आहे. मी उत्तम अशा पक्षी तज्ज्ञांना, पक्ष्यांना शिकवणाऱ्या हुशार शिक्षकांना घेऊन येतो. ते त्याला शिकवतील.” मग अनेकांनी भरपूर प्रयत्न केले. पण कुणालाच यश येईना. पक्षी तज्ज्ञ आले, पक्षी डॉक्टर आले. जगातल्या वेगवेगळ्या भागातून आले पण तो पक्षी फांदीवरून उडायला काही तयार होईना! शेठजीला आश्चर्य वाटले. एकाच जंगलातले एकाच झाडाच्या फांदीवर बसलेले दोन पक्षी आपण आणले. त्यातला एक पक्षी चांगला उडतो, इकडे तिकडे भराऱ्या मारतो, प्रतिसाद देतो, सारं काही करतो. पण दुसरा मात्र फांदीवरून उडायचं नावच घेत नाही, हा प्रकार शेठजींना फारच सतावत होता.
त्याच माणसाला आपण शोधून आणला पाहिजे, असं ठरवून शेठजी पुन्हा जंगलात गेले. अन् त्याला म्हणाले, “अरे तू मला जे दोन पक्षी दिले होते, त्यातला एक पक्षी चांगला निघाला आणि दुसरा मात्र खोटा. सहा महिने झाले एक पक्षी छान सगळीकडे उडतो आहे. भराऱ्या मारतोय, ऐकतोय सगळ्यांचं; पण एक पक्षी मात्र गेले सहा महिने एकाच फांदीवर बसून आहे. तूच चल माझ्यासोबत आणि त्या पक्ष्याला नीट करून दाखवं.” मग तो माणूस शेठजीच्या बागेमध्ये आला. तर त्यानं पाहिलं की खरंच, एक पक्षी तिथेच बसलेला आहे. त्याला पाहून तो जंगलातला माणूस म्हणाला, “शेठजी, तुम्ही उद्या सकाळी या हा पक्षी तुम्हाला उडताना दिसेल.” मोठ्या आत्मविश्वासाने तो माणूस म्हणाला. “किती पक्षी तज्ज्ञ, किती पक्षी डॉक्टर जगभरातून मी बोलावले त्यांना जमलं नाही आणि तू लगेच सांगतोस उद्या होईल! “फसवत नाहीस ना मला?” शेठजी म्हणाले. “तुम्ही उद्या नक्की या हा तुम्हाला पक्षी उडताना दिसेल.”
दुसऱ्याच दिवशी शेठजी बागेत आले. त्यांना माहीत होतं, की एक तर तो माणूस पळून तरी गेला असेल किंवा तो पक्षी तिथेच बसलेला असेल. पण बघतो तर काय तो माणूस माळ्याबरोबर गप्पा मारत उभा होता. शेठजीने मोठ्या आश्चर्याने विचारले, “काय रे लागला का आपला पक्षी उडायला! तसा तो माणूस म्हणाला, “होय शेठजी, बघा ना कसा मस्त उडतोय, छान भराऱ्या मारतोय.” मोठमोठ्या पक्षी तज्ज्ञांना जे जमलं नाही ते या जंगलात राहणाऱ्या साध्या माणसाला कसं काय जमलं! हे बघून शेठजी म्हणाले, “कसं शक्य झालं रे तुला!” “काही नाही शेठजी, तो ज्या झाडाच्या फांदीवर बसत होता ती फांदीच मी कापून टाकली, मग काय त्याला उडण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.”
मित्रांनो, आपणसुद्धा आयुष्यभर अशीच एक सुरक्षित फांदी धरून ठेवलेली असते. ती सोडायचा आपण कधीच प्रयत्न करीत नाही. त्यामुळे आपल्यात काही क्षमता आहेत, काही शक्ती आहे याचा आपल्याला अंदाजच येत नाही. मग आपल्या हातून भविष्यात जी चांगली कामं होणार आहेत त्याच्यापासून आपण दूर राहतो. म्हणूनच आपला विकास होत नाही. त्यासाठीच वर्षानुवर्ष धरून ठेवलेली ती सुरक्षित फांदी आपण सोडायला हवी; आपल्यातल्या क्षमता जोखण्यासाठी, आपल्या प्रगतीसाठी, आपल्या भविष्यासाठी!






