नवी दिल्ली : जागतिक राजकारणात भारताचे वजन सातत्याने वाढत असून, २०२६ मध्ये भारत ‘ब्रिक्स’ या समूहाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी सज्ज झाला आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी नुकतेच भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदासाठी अधिकृत संकेतस्थळ (वेबसाइट) brics2026.gov.in आणि लोगोचे उद्घाटन केले. जयशंकर यांनी भारताच्या दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य ‘मानवता प्रथम’ आणि ‘लोककेंद्रित’ असल्याचे सांगितले. ब्रिक्स २०२६ चा लोगो केवळ चिन्ह नसून भारताच्या सांस्कृतिक वारशाचा आणि जागतिक ऐक्याचा संदेश आहे.
लोगोची रचना भारताचे राष्ट्रीय फूल कमळावर आधारित असून, मध्यभागी ‘नमस्ते’ मुद्रा स्वागत व आदराचे प्रतीक आहे. लोगोच्या पाकळ्यांमध्ये ब्रिक्स सदस्य देशांच्या ध्वजांचे रंग समाविष्ट आहेत, जे विविधतेत एकता दर्शवतात.
२०२६ मध्ये ब्रिक्स समूहाची स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत आहेत. जयशंकर यांनी सांगितले की भारत उत्तरेकडील देशांच्या (ग्लोबल साउथ) समस्या जागतिक स्तरावर मांडण्यासाठी संधीचा उपयोग करेल आणि संयुक्त राष्ट्रे, जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) सारख्या संस्थांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. वेबसाइट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म नव्याने लाँच करण्यात आलेली वेबसाइट brics2026.gov.in हे बैठका, उपक्रम आणि करारांची माहिती देणारे मुख्य माध्यम असणार आहे. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि जगाला भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात होणाऱ्या हालचालींची वेळेवर माहिती मिळेल.






