नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
काही गाणी लोकप्रिय होतात ती एखाद्या गायकाच्या गायकीमुळे, काही लोकप्रिय होतात गाण्याच्या आशयाला अगदी अनुरूप असे संगीत मिळाल्यामुळे तर काही त्या गाण्याच्या जबरदस्त ठेक्यामुळे! अशी गाणी वर्षानुवर्षे ऐकूनही कधी जुनी होत नाहीत.
रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केलेला राजेंद्रकुमार आणि वैजयंती मालाचा ‘जिंदगी’ आला १९६४ साली. सिनेमात या दोघांबरोबर प्रमुख भूमिकेत होते राजकुमार, पृथ्वीराज कपूर, हेलन आणि मेहमूद. शिवाय ‘नेहमीचे यशस्वी’ म्हणून होते जयंत, लीला चिटणीस, जीवन, धुमाळ, कन्हैयालाल चतुर्वेदी, बेबी फरीदा (नंतरच्या फरीदा दादी) आणि मुमताज बेगम. सिनेमा चांगला चालला. त्याचा तामिळमध्ये वाझकाई पडागू(१९६५) या नावाने आणि तेलगूमध्ये ‘आडा ब्राथूकू’(१९६५) या नावाने रिमेकही आला होता.
‘जिंदगी’ची कथा टिपिकल श्रीमंत प्रेमी राजन (राजेंद्र कुमार) आणि गरीब प्रेमिका बीना (वैजयंतीमाला) या प्रकारातली होती. त्यामुळे मुलाचे वडील राय बहादूर गंगासरन (पृथ्वीराज कपूर) यांचा या लग्नाला विरोध असणे, त्यांनी लग्नाला नकार देऊन त्यात अनेक अडथळे आणणे वगैरे सर्व आलेच. वैजयंतीमाला नाटकात काम करून आपली व आपल्या विधवा आईची उपजीविका चालवणारी एक अभिनेत्री असते. तिला एकदम नकार न देता ‘एकदा तरी भेटा’ असा आग्रह राजन वडिलांकडे धरतो. तेंव्हा ते त्याला न कळवता थियेटरमध्ये जाऊन तिचा नाच पाहतात. त्यांना आपल्या मुलाचे लग्न एका नर्तिकेशी व्हावे हे अजिबात पटत नाही. ते लग्नाला स्पष्ट नकार देतात.
त्याकाळच्या फिल्मी रिवाजाप्रमाणे ‘माझ्या मुलाचा नाद सोडण्यासाठी तुला किती पैसे हवे ते सांग?’ असा प्रस्ताव ते एकांतात बीनापुढे मांडतात. मात्र कथानकात पुढे अनेक नाट्यमय घटना घडत जातात आणि शेवटी एका गंभीर प्रसंगातून गेल्यावर ते सुनेचा स्वीकार करतात आणि सिनेमा सुखांत होतो.
शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांच्या लेखणीतून उतरलेली ‘जिंदगी’ची सगळी गाणी लोकप्रिय झाली. त्यात मन्नाडे साहेबांच्या आवाजातले ‘मुस्कुरा लाडले मुस्कुरा’ (शैलेन्द्र) विषयाच्या वेगळेपणाने लक्षात राहिले. रफी साहेबांनी तबियतमध्ये गायलेले हसरत जयपुरी यांचे ‘पहले मिले थे सपनोमे और आज सामने पाया, हाय कुर्बान जाऊ’ रसिकांनी खूप पसंत केले. लतादीदींच्या आनंदी आणि दु:खी अशा दोन्ही मूडमधल्या ‘हम प्यार का सौदा करते हैं एक बार’ला (हसरत जयपुरी) तर त्यावर्षीच्या ‘बिनाका गीतमाला’च्या लोकप्रियतेच्या यादीत २८वा क्रमांक मिळाला होता. शंकर जयकिशन यांनी दिलेले संगीत कर्णमधुर तर होतेच शिवाय गाण्यात सूचित केलेल्या प्रेमाच्या बेधुंद, कलंदर भावना रसिकांच्या मनात अगदी सहज उतवरत होते. वैजयंतीमालाचा विजेसारखा पदन्यास, उत्कृष्ट अभिनय आणि वर लतादीदीचा नाजूक गोड आवाज, सगळी भट्टीच जमलेली होती!
तारुण्यातल्या प्रेमाची एक अवस्था असते जेंव्हा प्रेमिकाला सगळे काही शक्य वाटत असते. त्याला स्वत:च्या प्रेमाबद्दल जबरदस्त आत्मविश्वास असतो, अभिमान असतो. गीतकाराने त्या भावना अगदी उत्कटपणे या नृत्यगीताच्या शब्दात उतरवल्या होत्या.
वैजयंतीमाला मुळात शास्त्रीय नृत्य शिकलेली अभिजात कलाकार! ‘जिंदगी’च्या वेळी ती ३१ वर्षांची असून इतकी सुंदर दिसत होती की तिचे वय केवळ २४/२५ असावे असे वाटे. या गाण्याच्या वेळी त्यातून सिनेमाची थीम आणि त्यातली तिची एक मनस्वी मुलगी ही भूमिकाच सादर करायची असल्यामुळे तिने या गीतनृत्यात खूप समरसून अभिनय
केल्याचे लक्षात येते. तिचा अभिनय गीताचे शब्द जिवंत करतो-
‘हम प्यार का सौदा करते हैं एक बार, चाहे मिट जाएँ, चाहे मर जाएँ, हम प्यार का सौदा...’
प्रेमात तरुण मन इतके अनावर झालेले असते की ते म्हणते आता मृत्यू आला तरी काही चिंता नाही, पण माझे प्रेम कधीच कमी होणार नाही. हेच माझे पहिले आणि शेवटचे प्रेम!
कुणावर मनापसून प्रेम करणे म्हणजे जर आगीच्या डोंबात उडी मारणे असेल, तर मी त्यात सतत जळत राहायला तयार आहे. माझ्या जिवलगाची साथ मी केवळ जीवनातच नाही तर मेल्यावरही निभावेन. मला आता जगाची मुळीच पर्वा नाही.
‘इश्क तेरा आग है तो, इसमें जलते जाएँगे, मौत हो या जिन्दगी हम, साथ चलते जाएँगे, हम वो नहीं हैं प्यारके राही, जो दुनियासे डर जाएँ..’ हम प्यार का सौदा...’
मनाला भावलेल्या त्या एका जिवलग व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या कलंदर प्रेमिकाची मन:स्थिती जगावेगळीच असते. उत्कट भावनातिरेकाच्या त्या मानसिकतेत त्याला वाटते आपल्यावर असलेले छत्र उडून गेले, कुणाचाही आधार राहिला नाही, किंवा पायाखालची जमीन सरकून गेली तरी मी माझ्या प्रेमाचा अभिमानच बाळगेन. माझे प्रेम आता कुणापुढेही झुकणार नाही. जीवनात कितीही वादळे आली तरी मी मागे हटणार नाही. माझ्या प्रेमाची नौका मी जीवनाच्या उफाळणाऱ्या सागरात उतरवून पैलतीर गाठणारच आहे. मी प्रामाणिक प्रेमाचा सौदा एकदाच करून टाकला आहे. त्यात आता काहीही बदल शक्य नाही!
‘चाहे बदले आसमाँ और चाहे बदले ये जमीं, आँख नीची हो वफाकी, ऐसा हो सकता नहीं, हम तूफामें डालके कश्ती, डूबके पार उतर जाएँ.., हम प्यार का सौदा...’
आपल्या हिंदी गीतकारांची काही बाबतीत कमालच वाटते. एकीकडे अशी एकदाच होणाऱ्या प्रेमाच्या चिरंतनपणाची प्रांजळ कबुली देणारी हसरत जयपुरी यांची कविता तर दुसरीकडे त्याहून अगदी वेगळाच सल्ला देणारे गाणेही सापडतेच.
‘जिंदगी’नंतर ९ वर्षांनी आलेल्या ‘बॉबी’(१९७३)मध्ये विठ्ठलभाई पटेल यांनी एक गाणे लिहिले. मन्नाडे साहेबांच्या दमदार आवाजातल्या त्यांच्या आवाजासारखेच दमदार व्यक्तिमत्त्व लाभलेल्या प्रेमनाथच्या तोंडी दिलेल्या त्या गाण्याचे शब्द होते, ‘प्यार मे सौदा नही!’ लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी वेगळाच फेस्टीव मूड डेव्हलप करणाऱ्या संगीताने हे गाणे सुरू केले होते
“ना मांगू सोना चांदी, ना मांगू हिरा मोती, ये मेरे किस कामके, देता हैं दिल दे बदलेमे दिलके, प्यारमे सौदा नही. ”
चक्क नायिकेच्या बापाची भूमिका करणारा प्रेमनाथ या गाण्यात इतका बेधुंद नाचला होता की ज्याचे नाव ते! आपल्या सहज अभिनयाने गोव्यातील एका श्रीमंत पण रांगड्या कोळ्याचे व्यक्तिमत्त्व त्याने हुबेहूब उभे केले होते. पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी!






