मुंबई : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत इस्लाम पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून निवडणूक झालेल्या ८३ पैकी एकूण ३५ जागा निवडून आणत माजी आमदार आसिफ शेख यांनी करिश्मा केला आहे. समाजवादी पार्टीच्या ६ जागा निवडून आल्या आहेत. तर विद्यमान आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या एमआयएम पक्षाला धक्का बसला आहे. त्यांच्या केवळ २० जागा निवडून आल्या असून मंत्री दादा भुसे यांनी २० पैकी १८ जागा निवडून आणत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
मालेगाव महापालिका निवडणुकीत माजी आमदार असिफ शेख यांच्या इस्लाम पार्टीने जोरदार मुसंडी मारत ८४ पैकी ३५ जागांवर विजय मिळवला. तर एमआयएमची पीछेहाट होऊन त्यांना २० जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेनं निवडणुकीच्या रिंगणात २४ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी १८ उमेदवार विजयी झाले आहेत. समाजवादी पार्टीचे ६ उमेदवार निवडून आले आहेत. निवडणुकीत सर्वात मोठा फटका भाजपाला बसला आहे. त्यांनी २४ जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र फक्त २ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसला ३ जागांवर विजय मिळवता आला. या निवडणुकीत इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी यांनी युती करून ५६ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी त्यांचे ४१ उमेदवार निवडून आले आहेत. बहुमतासाठी ४३ नगरसेवकांची गरज असल्यामुळे माजी आमदार असिफ शेख कोणाची मदत घेतात याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे. निकाल जाहीर होताच शिवसेना आणि इस्लाम पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मंत्री दादा भुसे यांनी शिवसेनेच्या तर माजी आमदार आसिफ शेख यांनी इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांचे अभिनंदन करून सत्कार केला.






