Saturday, January 17, 2026

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या. सन्मानजनक जागा न मिळाल्याने शिवसेनेने भाजपबरोबरची युती शहरात तोडली. त्यानंतर शिवसेनेने स्वबळावर ११९ जागा लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेनेचा हा स्वबळाचा निर्णय तारणार का असा सवाल उपस्थित केला जात होता. शुक्रवारी महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर स्वबळाचा नारा शिवसेनेला जड गेल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. पुण्यात शिवसेनेने खातेही उघडता न आल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह नेत्यांना आत्मपरीक्षणाची वेळ आल्याचे बोलले जात आहे.

राज्यात भाजप, शिवसेनेने आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) असे महायुतीचे सरकार आहे. पुण्यातदेखील भाजप आणि शिवसेनेची युती होणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते. त्यानंतर शिवसेनेने भाजपकडे ३५ जागांची मागणी केली होती. पण, भाजपने प्रत्यक्षात १५ जागा देण्याची तयारी दर्शवली. सन्मानजनक जागा मिळत नसल्यामुळे शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ११९ जागांवर शिवसेनेने शहरात उमेदवार दिले.

जास्तीत जास्त उमेदवार शिवसेनेचे निवडून यावेत यासाठी शिवसेनेचा सोशल मीडिया सेल, शहरातील नेते जोरात कामालादेखील लागले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभांचे देखील शहरात आयोजन करण्यात आले होते. असे असताना देखील शिवसेनेने भोपळाही फोडता न आल्याने मतदारांनी शिंदेसेनेच्या एकला चलो रे च्या भूमिकेला नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. युतीमध्ये लढले असते तर किमान शिवसेनेच्या काही जागा निवडून आल्या असता असे चित्र शुक्रवारी दिसून आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा