सात जागा जिंकण्यात कलानींना यश
उल्हासनगर : उल्हासनगरच्या पालिकेत आपला अस्तित्व अबाधित ठेवण्यात कलानी कुटुंबाला यश आले आहे. गेल्या वेळी भाजपच्या चिन्हावर रिंगणात उतरणारे कलानी यंदा शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणुक रिंगणात होते. प्रभाग क्रमांक ६, ७ आणि आसपासच्या भागात कलानींनी बाजी मारली. या भागात सात जागा जिंकण्यात कलानींना यश आले आहे. प्रभाग क्रमांक दोनमध्ये कलानींचे प्रचारप्रमुख जमनु पुरस्वानी एकटेच जिंकू शकले आहेत, तर इतर तीन जागांवर भाजपने आपला झेंडा फडकवला.
उल्हासनगर महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून कलानी गटाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. उल्हासनगरच्या प्रभाग ६, ७ मध्ये कलांनीचा वरचष्मा असल्याचे दिसून आले आहे. त्या प्रभागात यंदाच्या निवडणुकीत रिपब्लिनक पक्षाच्या भगवान भालेराव यांनाही पराभवाचा धक्का दिला आहे.
या दोन प्रभागात त्यांनी सात जागा जिंकल्या आहेत. कलानी गटाने प्रभाग २, ९, १२ येथेही आपले समर्थक विजयी केले आहेत. कलांनी कुटुंबातून यंदा सिमा पप्पू कलानी निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यांचा प्रभाग क्रमांक ५ मधून विजयी झाल्या.
शहरात अनेक ज्येष्ठ माजी नगरसेवकांनी आपले बालेकिल्ले अबाधित ठेवले आहेत. यात प्रभाग क्रमांक ३ मधून राजेंद्रसिंह भुल्लर, प्रभाग चारमधून कलवंतसिह सहोता, प्रभाग ५ मधून मिना आयलानी, प्रभाग ८ मधून भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, प्रभाग १० मधून शिवसेनेचे राजेंद्र चौधरी, प्रभाग १३,१४ आणि १५ मधून शिवसेनेने आपले मराठीबहुल क्षेत्रात वर्चस्व अबाधित ठेवले आहे.
आई मुलगा, पती-पत्नी विजयी
उल्हासनगरच्या माजी महापौर लीलाबाई आशान, मीना आयलानी, विजयी झाल्या आहेत. लिलाबाई आशान यांचे पुत्र अरुण आशानही विजयी झाले आहेत. प्रभाग १० मधून शिवसेनेचे राजेंद्र आणि राजश्री चौधरी ही पती-पत्नीची जोडी विजयी झाली. प्रभाग ३ मधून चरणजीत कौर आणि राजेंद्रसिह भुल्लर या पती-पत्नीचा विजय झाला, तर प्रभाग २० मधून ललिता आणि प्रधान पाटील पती-पत्नी विजयी झाले आहेत, तर एकाच कुटुंबातील अमर लूंड, कंचन लूंड, शंकर लूंड विजयी झाले आहेत.






