सुंदर दुखापतग्रस्त; आयुष बदोनीला संधी?
मुंबई : आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या तोंडावर भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. संघाचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्धच्या उर्वरित वन-डे मालिकेनंतर आता संपूर्ण टी-२० मालिकेतूनही बाहेर पडला आहे. विशेष म्हणजे, या दुखापतीचे गांभीर्य पाहता सुंदरच्या वर्ल्ड कपमधील सहभागावरही आता टांगती तलवार निर्माण झाली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी करत असताना वॉशिंग्टन सुंदरला 'साईड स्ट्रेन'चा त्रास जाणवला. या सामन्यात केवळ ५ षटके टाकल्यानंतर त्याला वेदनांमुळे मैदानाबाहेर जावे लागले होते. जरी त्याने नंतर फलंदाजीसाठी मैदानात धाव घेतली असली, तरी त्याची दुखापत गंभीर असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे. बीसीसीआयने तातडीने निर्णय घेत वॉशिंग्टन सुंदरला वनडे मालिकेतून विश्रांती दिली असून, त्याच्या जागी युवा फलंदाज आयुष बदोनी याला संघात स्थान दिले आहे. सुंदरला अधिक उपचार आणि पुनर्वसनासाठी बंगळूरु येथील 'सेंटर ऑफ एक्सलन्स'मध्ये दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हाती आलेल्या वृत्तानुसार, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत तो खेळू शकणार नाही हे स्पष्ट झाले आहे. मात्र, सर्वात मोठी चिंता ही आहे की टी-२० वर्ल्ड कप सुरू होण्यासाठी खूप कमी कालावधी शिल्लक आहे आणि तोपर्यंत सुंदर पूर्णपणे फिट होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. भारतीय संघासाठी सुंदरची अनुपस्थिती हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण तो गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर संघाचा महत्त्वाचा कणा होता. आता वर्ल्ड कपसाठी संघ व्यवस्थापन त्याच्या जागी कोणाचा विचार करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टी-२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ
कर्णधार : सूर्यकुमार यादव
उपकर्णधार : अक्षर पटेल
विकेटकीपर : संजू सॅमसन, ईशान किशन
फलंदाज/अष्टपैलू : अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग
गोलंदाज : जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.






