महापालिकेच्या सभागृहात केली हॅटट्रिक
गणेश पाटील विरार : गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा हादरा बसलेल्या बहुजन विकास आघाडीने महापालिका निवडणुकीत पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. ११५ जागांपैकी ७० जागांवर त्यांचे नगरसेवक निवडून आले आहेत. तर भाजपने ४३ जागा जिंकण्यात यश आले आहे. शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे. तर उबाठा गटाला येथे खातेही उघडता आले नाही. राष्ट्रवादी अजित पवार गट यांची सुद्धा अशीच परिस्थिती राहिली असून, त्यांनाही या निवडणुकीत भोपळा फोडता आला नाही.
गेली ३५ वर्ष वसई-विरार परीसरात राजकीय वरदहस्त असलेल्या बहुजन विकास आघाडी या पक्षाला गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासह त्यांचे सुपुत्र क्षितीज ठाकूर तसेच राजेश पाटील हे तिन्ही उमेदवार विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे यावेळची वसई-विरार महापालिकेची निवडणूक बहुजन विकास आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई ठरली होती. दरम्यान, महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये बहुजन विकास आघाडी मोठा पक्ष ठरला होता. त्याचप्रमाणे जागा जिंकण्यात सुद्धा हाच पक्ष मोठा ठरला आहे. ११३ जागा स्वतंत्र लढवित दोन जागांवर बहुजन विकास आघाडीने काँग्रेस आणि अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. ११३ पैकी ७० इतक्या जागा या पक्षाने जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पालिकेत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. आता वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीची सत्ता आणि महापौर बसणार आहे हे स्पष्ट आहे.
दिग्गजांना फटका; ठाकूर यांचे चुलत बंधू पराभूत
वसई-विरार पालिकेच्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला आहे. माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे चुलत भाऊ पंकज ठाकूर यांना भाजपच्या मेहुल शहा यांनी पराभूत केले. तसेच माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांचा पराभव भाजपच्या गौरव राऊत यांनी केला. किरण ठाकूर यांनासुद्धा पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या रवी पुरोहित यांनी त्यांचा पराभव केला. बहुचर्चित उमेदवार धनंजय गावडे यांचा पराभव भाजपच्या जयप्रकाश सिंह यांनी केला. बविआचे माजी महापौर रूपेश जाधव यांना देखील पराभव पत्करावा लागला असून त्यांचा पराभव भाजपच्या विशाल जाधव यांनी केला. शिवसेनेचे सुदेश चौधरी यांना देखील पराभव पत्करावा लागला असून त्यांचा पराभव माजी सभापती प्रशांत राऊत यांनी केला. भाजपचे माजी नगरसेवक किरण भोईर यांना यावेळी पराभव पत्करावा लागला असून भाजपच्या अशोक शेळके यांनी त्यांचा पराभव केला आहे.
हा कार्यकर्त्याचा विजय आहे. ईव्हीएम मशीनमधील घोळ, मतदार याद्यांचे घोळ, दुबार मतदार नसते तर मोठ्या प्रमाणावर सदस्य निवडणून आले असते. मात्र मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक अनेक अडथळे निर्माण झाले होते. मात्र तरीही बहुमत मिळाल्याचा आनंद असून ही सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आहे. - हितेंद्र ठाकूर, माजी आमदार तथा बविआ अध्यक्ष.
" आम्ही लोकांपर्यंत पोचण्यास यशस्वी झाले असून मागील निवडणुकीत असलेल्या १ या सदस्य संख्येवरून ४३ सदस्य निवडणून आणण्यात यश आले आहे. बहुमत नसले तरी एक चांगल्या विरोधी पक्षाची भूमिका बजावू. महापालिकेला केंद्र आणि राज्यातून निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आणि विकासासाठी अनेक योजना राबविणार. - राजन नाईक, आमदार, नालासोपारा.






