मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रणागणांत कुख्यात गुंड अरुण गवळी यांच्या दोन मुलींसह वहिनीचा पराभव झाला आहे. अरुण गवळी यांची कन्या गीता गवळी या मागील तीन निवडणुकीत विजयी झाल्या असून विजयाचा चौकार ठोकण्यापूर्वीच त्यांचे स्वप्न भंग झाले आहे. प्रभाग क्रमांक २१२मधून अभासेच्यावतीने गीता गवळी निवडणूक रिंगणात होत्या. याठिकाणी महायुतीचा उमेदवार नव्हता. त्यामुळे गीता गवळी यांच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या; परंतु याठिकाणी पूर्णपणे समाजवादी पक्षाला मतदान झाल्यामुळे गीता गवळी यांचा पराभव झाला. तर भायखळा येथील प्रभाग क्रमांक २०७ मधून अरुण गवळी यांची दुसरी कन्या अभासेच्यावतीने निवडणूक रिंगणात होती; परंतु याठिकाणी भाजपचे रोहिदास लोखंडे यांनी त्याचा पराभव केला, तर प्रभाग क्रमांक १९८मधून शिवसेनेच्यावतीने अरुण गवळी यांची वहिनी वंदना गवळी निवडणूक रिंगणात होती. याठिकाणी उबाठाच्या अबोली गोपाळ खाड्ये यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे गवळी कुटुंबातील एकही सदस्य निवडून आले नाही. त्यामुळे गवळी कुटुंबाला धक्क्यावर धक्के बसलेले आहेत.