मोहोळांच्या रणनितीपुढे अजित पवार फिके; राष्ट्रवादीची पडझड
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. तब्बल ९ वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत पुण्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. प्राथमिक कलांनुसार भाजप जवळपास १०० जागांपर्यंत मजल मारण्याच्या तयारीत असून राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक अजित पवार विरुद्ध केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ अशी प्रतिष्ठेची ठरली होती. पुण्यात राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जाणारा परिसरही भाजपने काबीज करत ‘पुणे मॉडेल’ यशस्वी करून दाखवले. अखेर ही लढाई भाजपच्या पारड्यात गेल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पुणे शहरासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. मेट्रो प्रकल्प, रस्त्यांची अवस्था, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न प्रचारात केंद्रस्थानी होते. भाजपने ‘विकासाचा अजेंडा’ पुढे ठेवत मेट्रो विस्तार, भुयारी रस्ते, स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापन आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांवर भर दिला. त्याउलट राष्ट्रवादी काँग्रेसने मोफत पीएमपी बससेवा, मोफत मेट्रो प्रवास आणि छोट्या घरांना मिळकतकर माफी अशा लोकलाभाच्या घोषणा केल्या. मात्र पुणेकरांनी ‘फुकटच्या आश्वासनां’पेक्षा विकासालाच पसंती दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. भाजपच्या विजयामागे संघटनात्मक ताकद हा महत्त्वाचा घटक ठरला. बूथस्तरावर केलेली काटेकोर तयारी, कार्यकर्त्यांची मेहनत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अप्रत्यक्ष पाठिंबा भाजपसाठी निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काही प्रभागांमध्ये हिंदुत्ववादी भूमिका प्रभावी ठरली, तर मातब्बर नेत्यांच्या कुटुंबीयांना संधी दिल्याने भाजपला तुलनेने कमी खर्चात यश मिळाले.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार निवडीचा मोठा फटका बसला. काही ठिकाणी वादग्रस्त आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्याने पक्षावर टीका झाली होती. त्याचा थेट परिणाम मतदानावर झाल्याचे चित्र दिसून आले. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आक्रमक मुलाखती आणि अजित पवारांवर केलेली टीका भाजपसाठी टर्निंग पॉइंट ठरल्याचे मानले जात आहे. या निकालामुळे पुण्यातील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. भाजप पुन्हा एकदा महापौरपदावर दावा ठोकण्याच्या स्थितीत पोहोचली असून राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक आत्मपरीक्षणाची ठरणार आहे. पुणेकरांनी दिलेला कौल हा विकासाच्या राजकारणाला मिळालेली ठाम मान्यता मानली जात आहे.






