Wednesday, January 14, 2026

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम

पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या गाड्या सुरू करण्याच्या चर्चा रंगत असताना, प्रत्यक्षात मात्र सामान्य प्रवाशांचे हाल संपताना दिसत नाहीत. उपनगरीय मार्गावर मेल, एक्स्प्रेस आणि मालवाहू गाड्यांना झुकते माप दिले जात असल्याने लोकल सेवांचा मोठा बोजवारा उडाला असून, दैनंदिन प्रवाशांना कामावर जाण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी तासनतास विलंब होत आहे. १ जानेवारी २०२६ पासून रेल्वेने नवीन वेळापत्रक लागू केले. मात्र, यामध्ये पालघर, बोईसर आणि डहाणू या पट्ट्यातील प्रवाशांसाठी एकही नवीन लोकल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. जुन्या वेळापत्रकातील गाड्यांच्या वेळा केवळ ५ ते १० मिनिटे अलीकडे-पलीकडे करण्यात आल्या आहेत. नवीन वेळापत्रकानंतर गाड्या वेळेवर धावतील अशी अपेक्षा होती, मात्र जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच लोकल विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला आहे.

रेल्वे प्रशासनाने यापूर्वी दावा केला होता की, समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग सुरू झाल्यावर प्रवासी गाड्यांसाठी मार्ग मोकळा होईल. त्यासाठी अनेक ठिकाणी फाटक बंद करून उड्डाणपूल उभारले गेले. मात्र, प्रत्यक्षात मालवाहू मार्गाचा १०० टक्के वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. आजही मालगाड्या आणि स्पेशल गाड्या उपनगरीय मार्गावरूनच धावत असल्याने लोकलला 'लूप लाईन'वर ताटकळत उभे राहावे लागत आहे. एकीकडे १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना तसेच १८ डब्यांच्या वातानुकूलित गाडीची चाचणी करण्याचे पश्चिम रेल्वेने वेळापत्रक जाहीर केल्यानंतर १५ डब्यांच्या लोकल गाड्यांचा विस्तार विरार ते डहाणू रोड दरम्यान करणे अपेक्षित आहे. विरारच्या फलाट फेररचनेनंतर त्याची अंमलबजावणी होईल असे आश्वासन दिले जात असले तरी सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांमधून १५ डब्यांच्या गाड्या सुरू करणे अशक्य नव्हते असे प्रवाशांचे म्हणणे आहे. विरार ते डहाणू रोड दरम्यान झालेले औद्योगीकरण व परिणामी झालेले नागरीकरण यामुळे डहाणू रोड येथून सुटणारी उपनगरीय सेवा ही बोईसर रेल्वे स्थानकातच गच्च भरून जात असते. या पार्श्वभूमीवर बोईसर व पालघर येथून बोरिवली, अंधेरी, दादर करिता उपनगरीय सेवा सुरू करावी ही अपेक्षा देखील फोल ठरली आहे. नवीन वेळापत्रकामध्ये गर्दीच्या वेळी तसेच पहाटे लवकर व रात्री उशिरा नव्याने उपनगरीय सेवा सुरू करण्याची मागणी नवीन वेळापत्रकात दुर्लक्षित राहिली आहे. असे असताना दोन्ही दिशेला किमान चार-पाच प्रसंगी अर्ध्या पाऊणतासाच्या अंतरावर तीन-चार गाड्या धावण्याचे प्रकार घडत असून अशा प्रसंगी रिकामी धावणाऱ्या सेवांमधील अंतर वाढवून गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करणे देखील गरजेचे झाले आहे.

नव्याने सेवा सुरू करताना थेट चर्चगेटपर्यंत गाडी उपलब्ध व्हावी तसेच विरार व बोरिवली इथपर्यंत असणाऱ्या सेवा पुढे अंधेरी दादरपर्यंत विस्तारित करण्याच्या मागणीचादेखील गांभीर्याने विचार व्हावा अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे उपनगरीय सेवा विरारपलीकडे धावताना केळवे रोड, पालघर, बोईसर व वाणगाव या रेल्वे स्थानकात अनेकदा बाजूला (साईडिंग) आणून ठेवल्या जात असून अशा प्रसंगी दोन ते पाच लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देऊन पुढे काढले जाण्याचे प्रकार घडत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा