Wednesday, January 14, 2026

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांसाठी अडचणी वाढवल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की, इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिका २५ टक्के टॅरिफ लावणार आहे. ट्रम्प यांनी हा आदेश अंतिम आणि निर्णायक असल्याचे सांगितले आहे. या निर्णयामुळे इराणवर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आपल्या ट्रुथ सोशल या प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी सांगितले की, “तत्काळ प्रभावाने, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणसोबत व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही देशाला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका सोबत होणाऱ्या सर्व व्यवसायावर २५ टक्के टॅरिफ भरावा लागेल. हा आदेश अंतिम आणि निर्णायक आहे.” मात्र, ही धोरणे नेमकी कशी अमलात आणली जातील, कोणत्या देशांवर त्याचा परिणाम होईल, किंवा मानवीय अथवा धोरणात्मक व्यापारासाठी काही सवलत दिली जाईल का, याबाबत ट्रम्प यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. गेल्या सुमारे १५ दिवसांपासून इराणमध्ये देशव्यापी आंदोलन सुरू आहेत. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, हे शुल्क तत्काळ लागू होतील. यापूर्वी व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनीही अप्रत्यक्षपणे इराणला इशारा दिला होता.

ट्रम्प यांच्या या पावलामुळे जागतिक पातळीवर अमेरिकेचे अनेक महत्त्वाचे व्यापार संबंध बिघडण्याची शक्यता आहे. इराणच्या व्यापार भागीदारांमध्ये केवळ शेजारी देशच नव्हे, तर भारत, तुर्की, चीन आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांचाही समावेश आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की त्यांचे प्रशासन तेहरानसोबत बैठक घेण्यासाठी चर्चा करत आहे. मात्र, मृतांचा आकडा वाढत जाणे आणि इराणी सरकारकडून आंदोलकांना अटक करण्याची कारवाई सुरू राहिल्यास, त्या आधीच कारवाई करावी लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

Comments
Add Comment