Wednesday, January 14, 2026

गोड बोलण्याचे सामर्थ्य

गोड बोलण्याचे सामर्थ्य

निशा वर्तक

तीळगूळ घ्या, गोड बोला’ ही केवळ एक म्हण नाही; तो आपल्या संस्कृतीचा गाभा आहे, जीवनाला दिलेला एक प्रेमळ सल्ला आहे.

गोड बोलणे ही एक कला आहे. काही जणांकडे ती जन्मजात असते, तर काहींना ती प्रयत्नाने मिळवावी लागते. पण संत सांगतात तसे “ठरविले तर साध्य होते”. मनाने ठरवले, तर गोड बोलणे अशक्य नाही. गोड बोलणे हा एक संस्कार आहे, एक संस्कृती आहे; तर कडू बोलणे ही एक विकृती आहे, जी मनालाही कुरतडते आणि नात्यांनाही पोखरते.

गोड बोलण्याचे अमाप फायदे आहेत. असं म्हणतात ना “गोड बोलेल तो जग जिंकेल.” खरंच, ज्याचे बोलणे गोड, त्याचे जीवनही गोड होते. घरातसुद्धा जर आपण एकमेकांना समजून घेऊन, थोड्या खालच्या आवाजात, प्रेमाने बोललो, तर त्या घरात आपोआप शांती नांदते. लहान मुलांनाही प्रेमाने समजावून सांगितले, तर ती ऐकतात; पण ओरडून, रागावून सांगितले, तर ती बंडखोर होतात. शब्दांमध्ये जर मायेची ऊब असेल, तर मन आपोआप वाकते.

गोड बोलण्याने आपली कितीतरी कामे सहज होतात. व्यवहारात तर गोड बोलण्याला फारच महत्त्व आहे. एखाद्या सेल्समनला आपली वस्तू विकायची असेल, तर त्याला गिऱ्हाईकाच्या मनाची भाषा समजून, गोडच बोलावे लागते. तेव्हाच व्यवहार जुळतो, विश्वास निर्माण होतो.

याच गोड बोलण्याची ताकद मला माझ्या सासूबाईंच्या अनुभवातून प्रकर्षाने जाणवली. त्यांना जेव्हा कधी बरे वाटायचे नाही, तेव्हा त्या हमखास म्हणायच्या,

“मला त्या अमुक डॉक्टरांकडे घेऊन चल, मला लगेच बरं वाटेल.”

आणि खरंच, त्या डॉक्टरांकडे गेल्यावर ते त्यांचा हात धरून, हसत म्हणायचे,

“आजी, काही झालेलं नाही तुम्हाला. हे एक दिवसाचं औषध घ्या, लगेच बरं वाटेल.”

आणि खरंच, त्यांना बरं वाटायचं. औषधापेक्षा त्यांच्या शब्दांतली सकारात्मकता अधिक प्रभावी असायची. संत म्हणतात तसे “शब्दही औषध असतात.”

गोड बोलण्याचा आणखी एक अनुभव मला रिक्षावाल्याबाबत आला. एकदा मार्केटमध्ये असताना माझा पाय मुरगळला. वेदना खूप होत होत्या. एकही रिक्षावाला थांबेना. मनात राग उसळत होता, असहाय्यपणाची जाणीव होत होती. शेवटी एक रिक्षावाला थांबला.

मी त्याला म्हणाले, “बामणवाड्याला घ्या.”

तो म्हणाला, “ताई, तिकडे नाही येणार, चकाल्याला सोडतो.”

मनात संताप उफाळून आला, पण मी स्वतःला सावरले. संतवाणी आठवली “रागाने पेटलेले शब्द विझवतात, प्रेमाने बोललेले शब्द उजळवतात.”

मी शांतपणे म्हणाले, “बरं बाबा, तिथेच सोड. तुम्ही थांबलात, हेच माझं नशीब. तिथून हळूहळू चालत जाईन.” तेवढ्यात त्याचं मन बदललं. तो माझ्याशी गप्पा मारू लागला, त्याच्या अडचणी सांगू लागला, मी कशी पडले हे विचारू लागला आणि चकाल्याला आल्यावर तो म्हणाला, “ताई, मी तुम्हाला घरापर्यंत सोडतो.”

आणि खरंच, त्याने मला थेट गेटपर्यंत सोडले. गोड बोलण्याची ताकद अशी असते, समोरच्याचं मन बदलते, अंतर मिटते, माणुसकी जागी होते.

पण काही लोकांना गोड बोलताच येत नाही. ते कायम वाकड्यात, टोचून बोलतात. शब्द शस्त्रासारखे वापरतात. त्यांचे शब्दबाण मनाला जखमी करतात. पण त्यांना त्याची जाणीवही नसते. अशा बोलण्याने ते दुसऱ्यांचे मन दुखवतातच, पण आपलेही नाव खराब करून घेतात. नकळत त्यांच्याच मनावर त्याचे वाईट संस्कार होत जातात.

अशा माणसांपासून दूर जावेसे वाटते. ते समोरून आले, की आपल्याला रस्ता बदलावा वाटतो. अशा माणसांची नाती टिकत नाहीत, मैत्री तुटते. संत म्हणतात “शब्द जपले नाहीत, तर संबंध टिकत नाहीत.” गोड बोलण्यासाठी पैसे लागत नाहीत. त्यात आपले काहीच नुकसान होत नाही. तरीही गोड बोलणे आपल्याला का जमत नाही? आपण समोरच्याशी गोड बोललो, तर त्याच्या मनात आपल्याबद्दल आदर निर्माण होतो, चांगले विचार रुजतात. शरीरात चांगले हार्मोन्स पाझरतात, मन प्रसन्न होते, आणि सकारात्मकतेचा झरा वाहू लागतो ज्याचा फायदा आपल्यालाही होतो.

दुसऱ्याचे मनापासून कौतुक करायला आपण कंजूष का होतो? कौतुक करण्यासाठीही मोठं मन लागतं. बरं, कौतुक नको; गोडही नको, गप्प राहा. पण कडू बोलू नका. कुणाचं मन दुखवू नका. कारण संत म्हणतात की “मन दुखावणं हे मोठं पाप आहे.”

मकरसंक्रांतीच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा!

तीळगूळ घ्या… आणि गोड गोड बोला.

Comments
Add Comment