खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती
रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची पावसामुळे दुर्दशा होते. मात्र याकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने दरवर्षी खारापटी गावांमधील गणेश आळी मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून रस्ता दुरुस्तीची मोहीम हाती घेत,.' गड वाचवा, दुर्ग संवर्धन करा ' या भावनेतून मित्र मंडळीने रविवारी दिवसभर श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे करण्याबरोबरच झाडीझुडपे साफ केली. गडावर प्रवेश करण्याआधी दहा ते पंधरा फूट लांबीची एक फांज लागते. ही फांज खोल असल्याकारणाने गडप्रेमींना गडावरती जाण्यास अडथळा निर्माण होत असतो; परंतु ही तरुण मंडळी दरवर्षी तिथे लाकडी पूल तयार करतात. गेल्या पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे आणि पाण्याचा निचरा न झाल्यामुळे अवचित गडाकडे जाणाऱ्या पायवाटेवर आणि मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. यामुळे पर्यटकांना आणि दुर्गप्रेमींना गडावर जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा पर्यटक घसरून सुद्धा पडतात. संबंधित विभागाचे याकडे कायम दुर्लक्ष होत आहे.
खारापटी गावातील गणेश आळी मित्र मंडळीतील महेश चोरगे, जागृत पाटील, चेतन पाटील, शुभम पोकळे, कल्पेश पोकळे, रोहित सानप, केतन पीटनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गडाच्या पायथ्याशी खारापटीतील इतर तरुण जमा झाले होते. कुदळ, फावडे आणि इतर साहित्यांसह त्यांनी रस्ता दुरुस्तीला सुरुवात केली.
रस्त्यावरील मोठे दगड बाजूला करणे, खड्डे मुरूम टाकून बुजवणे आणि वळणावरील अडथळा ठरणारी झुडपे काढण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले. छत्रपती शिवाजीमहाराजांचा वारसा जपणे हे आमचे कर्तव्य आहे. प्रशासनाच्या निर्णयाची वाट न पाहता, दुर्गप्रेमींना त्रास होऊ नये म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आहे .
यापुढेही गडाच्या संवर्धनासाठी आम्ही सदैव तत्पर राहू अशी भावना गणेश आळी मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी 'दैनिक प्रहार'शी बोलताना सांगितले.






