माेरपीस : पूजा काळे
लग्नसराईत नटण्याची हळदीला कोण घाई कुंकुमतिलकाने सौभाग्य वाणाची लयलूट होई. कुमारिका, सौभाग्यवती यांना देण्यात येणारं वाण संस्कृतीचा भाग झालं. पुढे जाऊन या वाण प्रथेने साहित्य आणि संस्कृतीवर आपली मोहोर उठवली. एका वाक्यात सांगायचं झालं तर, सवाष्ण वाणं म्हणजे सहज प्राप्त होणाऱ्या उपयुक्त गोष्टींचा साधक विचार. प्रापंचिक जीवनात वापरात येणाऱ्या तसचं गृहिणींना आनंद देणाऱ्या गृहोपयोगी वस्तू वा जिन्नस यांची लयलूट जी काळ्या-पांढऱ्या तिळावर गुळरूपाचा संस्कार करते. हवेत पडलेल्या गारव्याला थोडीशी ऊब मिळावी या हेतूने संस्कारित सण साजरा करताना हळदी-कुंकवाचं महत्त्व वाढतं. वर्षभराने येत असलेल्या सणाची पाळंमुळं जनमानसात मुरलेली असल्याने उसनं वाणं देण्या-घेण्याच्या प्रथा संस्कृतीला जिवंत ठेवतात. घरोघरच्या हळदी-कुंक घाटातला पहिला सौभाग्याचा मान सुवासिनींचा. विसरता न येण्यासारखा कुंकवाचा विषय महिलांसाठी हळव्या कोपऱ्यासारखा असतो. माथ्यावरचं भलंमोठं कुंकू धन्याची साक्ष देतं, त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करतं. आपल्या धर्मात लहानपणापासून भाळी गंध लावली जात असल्याने मुलगा वा मुलगी गंध, नाम, बुक्का, कुंकू, चिरी, टिकल्या कपाळाची शोभा वाढवताना दिसतात. बाल्यावस्थेत काजळ, पावडर टिका, चंदन टिळा लावून सजवलं जातं. कुमारिका पूजल्या जातात. त्यांच्यावर संस्कार होतात. हळदी-कुंकवाची व्याख्या पसरते. मुली संस्कार विसरत नाहीत, नव्याने शिकत जातात. संस्कृतीतील महत्त्वाचा विधी आणि सामाजिक सोहळा असलेलं हळदी-कुंकू सौभाग्य-आरोग्य- समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानलं जातं. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमातही कुंकू वापरलं जातं. त्याला सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं ज्याने नकारात्मक ऊर्जा दूर सारली जाते. स्त्रियांच्या सौभाग्याचे रक्षण करता पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. दुर्गादेवी आणि लक्ष्मीमातेची कृपा प्राप्त होण्यासाठी कुंकुमतिलकाने पूजा आराधना केली जाते. कुंकवाला पिंजर असंही संबोधलं जातं. धार्मिक बाबतीत, मंगल कार्यात कुंकवाचा वापर केला जातो. बालपणीच संस्कृतीचा ठेवा घेऊन आलेलं कुंकू म्हणजे कैक अनुभवाची पुंजी असते जी सासर माहेराला जोडणारा दुवा असते. आनंदाची आनंदाला भेट घडवण्यासाठी हळदी-कुंकवाचं प्रयोजन केलं जातं. देवतांना कुंकूमार्जन प्रिय असल्याने त्यांचा आशिष पाठीशी राहतो. असे मानले जाते की, ब्रह्मांडातील सुप्तशक्त जागी होऊन स्त्रियांच्या ठिकाणी लक्ष्मीतत्त्व जागृत होतात. कुंकवाची बोट मस्तकी लागताचं शक्ती संचारते. नकारात्मक ऊर्जा शोषली जाते. एकाग्रता वाढते, ज्यामुळे घर आणि कुटुंबाचं रक्षण होतं. बाईला बाईपण येतं. संस्कार संस्कृतीच्या छायेत पिढ्या शिकून मोठ्या होतात. आनंदाला पारावार उरत नाही. पदरात पडलेलं सौभाग्याचं दान शाश्वत लेणं होऊन सुखावतं.
कुंकवाचं स्थान अधोरेखित करताना बहिणाबाई म्हणतात...
लपे करमाची रेखा, माझ्या कुंकवाच्या खाली... पुशीसनी गेलं कुकू, रेखा उघडी पडली...
कपाल रेखा उघडी पडण्याचं दृर्भाग्य कुणालाही नको असतं. पण सत्याशी पाठ दाखवता येत नाही हेचं खरं. कुंकवाचं लेण म्हणजे सौभाग्याचं लेणं. ज्यात स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाणारे दागिने, मंगळसूत्र, बांगड्या, कुंकू, जोडवी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. यात मंगळसूत्र सर्वात श्रेष्ठ मानले जाते.
याच दिवशी संस्कृती, परंपरा जोपासणारे सण चैतन्य घेऊन येतात. चैतन्याची ज्योत कायम तेवत ठेवण्याच्या वचनात इतरांना सणाचा आनंद देतो. तिळाचा गोडवा कायम राखणारे आशेचे पतंग भरारी घेण्याची स्वप्न पाहतात. मनात वृद्धिंगत होणारा दीपोत्सव कायम उजळत राहावा या हेतूने नववर्षाच्या प्रारंभी आलेला सण घरादारावरची जळमटं दूर सारतो. सूर्याचा मकर राशीतला प्रवेश म्हणजे सण दाराशी आल्याचा सांगावा. हिवाळ्यातल्या गुलाबी दिवसाची ऊबदार रजईतली झोप अनिवार होते. पित-केशरी तांबड फुटण्यापूर्वी, कोंबड्याने बांग देण्याआधी आसमंत दवात नाहतो. शीत वारे दारखिडक्यांच्या फटीतून डोकावतात. पक्षी किलबिलाटाने सभोवती निसर्गमय शाळा सुरू होते. सौर कालगणनेशी संबंधित संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. दिवस मोठा रात्र लहान होत जाते. हंगामात उष्णता वर्धक हरभरे, गहू लोंबे, ऊस, तीळ, मटार, बोरं धान्याची शेती झाल्याने गरजेनुसार आदान-प्रदान होते. माती तत्त्वाने भरलेल्या सुगडाची हरभरा, तीळगूळ, ऊस, बोराने पूजा बांधली जाते. मानाची, पानाची, दानाची परंपरा जोपासताना काळ्या रंगाचे महत्त्व अबाधित असल्याने तीळगूळ घ्या, गोड गोड बोला, आमचा तीळ सांडू नका आमच्याशी भांडू नका अशा संदेशाचा, सामाजिक सद्भावना वाढवणारा आणि सद्वविचारांचे आदान प्रदान करणारा सण भारतीय परंपरेचा आरसा दाखवतो. आजचा दिवस उत्साहाने साजरा करायचा. वायुवेगे वाहणाऱ्या वाऱ्याला पतंगाच्या साथीने उडवण्याचा, विविधांगी रंग जनमानसात पसरविण्याचा. मनरूपी पतंग आकाशात भिरभिरवण्याचा.
खेळाशी मेळ साधत आलेला दिवस चांगुलपणाने जपण्याचा. शेक्सपियरच्या मते माणसाच्या हृदयात उगम पावलेला चांगुलपणा त्याच्यानंतर मागे उरतो. दिव्याचा प्रकाश लांबवर पसरतो तसे चांगुलपणाची किर्ती दूरवर पसरते. कारण तेव्हा तुम्ही इतरांशी आणि स्वत:शी उत्तम वागलेले असता. आनंदाचं दुसरं नाव उत्तम वागणं आहे, जेणेकरून जेवढं मन उत्साही आणि आनंदी तेवढा तुमचा पतंग आकाशाला गवसणी घालण्याचा संकल्प बांधणारा ठरेल. शरीराला जशी आरामाची गरज असते तशीचं मनाला चैतन्याची गरज असते. हळदी-कुंकवाच्या निमित्ताने एकत्र येऊन नाती वृद्धिंगत करता येतात. सद्भावना वाढवता येते. मैत्रैय कायम राखता येते. तीळगुळाची गोडी आधी मनात मग नात्यात पेरता आली की मन पाखरांचे थवे बनून स्वैर मोकळ्या आकाशात स्वच्छंदी विहारायला मुक्त होतं, हीच या सणांची जादू आहे.






