मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा
टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन डॉलर्सच्या (सुमारे १४० कोटी रुपये) सोन्याच्या चोरीप्रकरणी कॅनडा पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. या चोरीचा मुख्य सूत्रधार आणि एअर कॅनडाचा माजी कर्मचारी अजूनही भारतात लपून बसला असून, त्याच्या अटकेसाठी कॅनडाभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वॉरंट जारी करण्यात आले आहे.
१७ एप्रिल २०२३ रोजी स्वित्झर्लंडहून आलेले ६,६०० सोन्याच्या विटांचे (भार ४०० किलो) कंटेनर टोरंटो विमानतळावरून लंपास करण्यात आले होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे ही चोरी करण्यात आली होती, ज्याला कॅनडाच्या इतिहासातील 'सर्वात मोठी चोरी' म्हटले जाते. एअर कॅनडाचा माजी व्यवस्थापक अर्चित ग्रोव्हर आणि सिमरन प्रीत पनेसर हे या चोरीचे मुख्य दुवे मानले जात आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनेसर हा अजूनही भारतात सुरक्षित ठिकाणी लपून बसला आहे. ही चोरी इतक्या सफाईदारपणे करण्यात आली होती की, विमानतळाच्या सुरक्षा यंत्रणेतील कोणाचा तरी हात असल्याशिवाय हे शक्य नव्हते. पनेसरने एअर कॅनडाचा कर्मचारी असताना बनावट 'वे-बिल' तयार करून चोरीला मदत केल्याचा आरोप आहे. कॅनडा पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत अनेक आरोपींना अटक केली असून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे.






