मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; १६ तारखेनंतर भांडुपमध्ये विकासाची गंगा आणू
मुंबई : कोकण नगर, भांडुप येथे झालेल्या सभेत मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी उबाठा आणि ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. “उबाठाने ‘मिनी कोकण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भांडुपला बकाल अवस्थेत नेले असून, १६ तारखेनंतर येथे विकासाची गंगा आणू,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राणे म्हणाले की, “पूर्ण राज्यभर प्रचार करत करत मी आता मिनी कोकणात, म्हणजेच भांडुपमध्ये येऊन थांबलो. कोकण आणि भांडुपमधील परिस्थितीत जमीन-आसमानाचा फरक आहे. कोकणातील घरे, रस्ते आणि निसर्ग सौंदर्य पाहा, आणि इथली परिस्थिती पाहा. येथील कोकणी माणसांची अवस्था बदलण्याची गरज आहे.” बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना मराठी माणसासाठी उभी केली; मात्र त्यांच्या पुढील पिढीने त्या विचारांशी प्रतारणा केली. त्यामुळे मराठी माणूस मुंबईत का कमी झाला, याचे उत्तर उबाठावाल्यांनी द्यायला हवे. त्यांच्या सोबत फरफटत गेलेल्यांनीही (मनसे) त्यांना जबाबदार धरले पाहिजे. ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे त्यांनाही पटले आहे. त्यामुळे आता कोकणी माणसाने त्यांचा नाही, तर स्वतःचा विचार केला पाहिजे, असे आवाहन नितेश राणे यांनी केले.
कोकणातील लोकसभा आणि विधानसभा निकालांचा उल्लेख करत राणे म्हणाले, “कोकणातील जनतेने निर्धार केला आणि सर्व खासदार महायुतीचे निवडून आले. विधानसभेत फक्त भास्कर जाधव थोडक्या मतांनी निवडून आले. कोकणातील विकास भांडुपमध्ये पाहायचा असेल तर १५ तारखेला महायुतीशिवाय दुसरा विचार करू नका. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की कोकण हा शिवसेनेचा कणा आहे. तोच कणा मोडण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. येत्या १६ तारखेला महायुतीचा महापौर बसल्यावर उद्धव ठाकरे बॅग पॅक करून लंडनला जातील”, असा दावाही त्यांनी केला.
शेवटी कोकणवासीयांना उद्देशून ते म्हणाले, “सरकारमध्ये तुमच्या या भावाचे वजन आहे. देवा भाऊंच्या आवडत्यांपैकी मी एक आहे. काळजी करू नका. १५ तारखेला फक्त ‘जय कोकण’ म्हणा आणि कमळ चिन्ह दाबा”, असे आवाहन देखील त्यांनी केले.






