प्रचार बंदी नंतरही उमेदवाराला गाजावाजा न करता प्रचार करता येणार?
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचार मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपुष्टात आल्यानंतर उमेदवाराला पुढील प्रचाराला पूर्णपणे बंदी राहणार आहे. परंतु प्रचार बंद झाल्यानंतर उमेदवाराला पुढील प्रचाराबाबत आयोेगाने जारी केलेल्या नियमांमुळे उमेदवार आणि राजकीय पक्षांमध्ये गोंधळात गोंधळ निर्माण झाला आहे. आयोगाने निवडणूक आचारसंहितेबाबत जारी केलेल्या नियमांमध्ये मंगळवारी सायंकाळी प्रचार थांबल्यानंतर माईकचा वापर न करता प्रचार करता येईल असे म्हटले आहे. आयोगाच्या या नियमांमुळे प्रचार थांबल्यानंतर प्रचार करण्यास परवानगी आहे की छुप्या प्रचाराला उघडपणे परवानगी दिली अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहितेच्याबाबत सर्वसाधारण सूचना करताना जाहीर प्रचाराच्या कालवधीबाबतही सूचना केल्या आहेत. यामध्ये अधिनियमातील तरतुदी व त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाचे आदेश यानुसार जाहीर प्रचाराचा कालावधी मतदान समाप्तीच्या ४८ तास अगोदर म्हणजे १० तारखेला मतदान असल्यास ८ तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता प्रचार बंद होईल. म्हणजेच या कालावधीमध्ये कोणतीही प्रचार सभा घेता येणार नाही. तसेच कोणत्याही दिवशी रात्री दहा नंतर ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच मोर्चे, सभा इत्यादी घेता येणार नाही.
जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर उमेदवार मतदान केंद्राच्या १०० मीटर बाहेर मतदारांना भेटून तसेच घरोघरी जावून प्रचार करू शकतील, मात्र, माईकचा वापर करता येणार नाही आणि समुहाने फिरता येणार नाही असे यामध्ये म्हटले आहे.
आयोगाच्या निर्देशानुसार, उमेदवाराला प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर घरोघरी जावून लोकांच्या गाठीभेटी घेता येतील अशाप्रकारच्या स्पष्ट सूचना असल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड गोंधळात गोंधळ निर्माण झाला आहे. एरव्ही निवडणूक प्रचार संपुष्टात आल्यानंतर विविध सोसायटी, वस्त्या आणि मंडळांमध्ये छुप्या बैठका घेतल्या जातात आणि उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी मतदान करण्याचे आवाहन करतात. या भेटीगाठीमध्ये कोणत्याही प्रकारे चिन्ह किंवा उमेदवार जाहिरपणे प्रचार न करता छुप्या पध्दतीने बैठका घेवून प्रचार करत असतात. त्यामुळे प्रचारानंतर केल्या जाणाऱ्या या छुप्या प्रचाराला अधिकृत मान्यताच देण्यात आली आहे.